रक्तदाब असलेल्या नागरिकांना आरोग्य सेवा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:51+5:302021-08-13T04:28:51+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १०० लोकसंख्येमागे २५ व्यक्ती या उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले असून त्याअनुषंगाने शहरातील नागरिकांचे स्क्रीनिंग ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १०० लोकसंख्येमागे २५ व्यक्ती या उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले असून त्याअनुषंगाने शहरातील नागरिकांचे स्क्रीनिंग करून उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात मानसिक ताणतणाव, अनियमित आहार, जंक फूड तसेच व्यायामाच्या अभावामुळे नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शंभर व्यक्तींमागे २५ व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. म्हणून अशा व्यक्तींचा शोध घेऊन रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचा उपक्रम महापालिका आरोग्य विभागातर्फे हाती घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागांतर्गत भारतीय उच्चदाब नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्स, एएनएम यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले.
शासनाच्या आदेशाने व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण आयोजित केले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. समीर नवल व संतोष ननवरे यांनी प्रशिक्षण दिले. यामध्ये ऑनलाइन ॲप्लिकेशन कसे भरायचे. रुग्णाला ३० दिवसांची औषधे दिल्यानंतर त्याच्या गोळ्या संपल्यावर रुग्ण पुढील औषधे घेण्यासाठी आला नाही तर त्याला या सॉप्टवेअरद्वारे कसे अलर्ट केले जाणार याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा प्रारंभ उपायुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात नागरिकांची पडताळणी करून उच्च रक्तदाब आढळणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. उच्च रक्तदाब आढळलेल्या रुग्णांची केंद्रात नोंदणी करून त्यांना उपचार कार्ड देण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.