प्राथमिक शिक्षकांना विमा संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:39+5:302021-04-30T04:28:39+5:30
आजरा : कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये गावातील सर्व व्यक्तींचे तापमान व ऑक्सिजन तपासणी करणे, कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची यादी करणे, ...
आजरा : कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये गावातील सर्व व्यक्तींचे तापमान व ऑक्सिजन तपासणी करणे, कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची यादी करणे, जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवणे यासह विविध प्रकारची कामे शिक्षक करत आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना शासनाचे विमा संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आजरा तहसीलदार विकास अहिर यांना दिले आहे.
कोरोनाबाबतची कामे करीत असताना नकळत शिक्षक कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येऊन बाधित होत आहेत. काही शिक्षकांना प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. यासाठी शिक्षकांचे मनोबल उंचावून त्यांचे कुटुंबांचे उत्तरदायित्व म्हणून शासनाने शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे, गेली दोन वर्षे ज्या शिक्षकांनी निवडणूक बी.एल.ओ. म्हणून काम केले आहे, त्यांचे मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर, समन्वय अध्यक्ष एकनाथ आजगेकर, मायकेल फर्नांडिस, सुनील कांबळे, बाळासाहेब पाटील, उमाजी कुंभार, रवींद्र दोरुगडे, सुरेश देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळी :
प्राथमिक शिक्षकांना विमा संरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांच्याकडे देताना एकनाथ अजगेकर, मायकल फर्नांडिस, सुनील कांबळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
क्रमांक : २९०४२०२१-गड-०१