शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:31+5:302021-04-29T04:18:31+5:30
सेनापती कापशी : गारपिटीमुळे अर्जुनवाडा, नंद्याळ, मुगळी, करड्याळ, जैन्याळ व हळदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदारांनी सात ...
सेनापती कापशी : गारपिटीमुळे अर्जुनवाडा, नंद्याळ, मुगळी, करड्याळ, जैन्याळ व हळदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदारांनी सात दिवसांत या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत, असे आदेश देत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
चिकोत्रा खोऱ्यात गारपिटीने नुकसान झालेल्या अर्जुनवाडा, मुगळी, करड्याळ, नंद्याळ येथे शेतातील पिकांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, शशिकांत खोत, सरपंच प्रदीप पाटील, सरपंच राजश्री पाटील, मंडल अधिकारी एम. के. कुंभार, विशाल कुंभार, सागर पाटील आदींसह शेतकरी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
गारपिटीने ऊसपिकाचे न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या कलिंगड, कोबी, बावची, दोडका, भेंडी, मक्का, मिरची आदी भाजीपाला संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच अर्जुनवाडा येथे धनगरबांधवांची काही लहान बकरीही गारपिटीने मरण पावली आहेत. त्यांनाही आपत्ती व्यवस्थापनातून आर्थिक मदत मिळवून देऊ, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.
फोटो :२८ नंद्याळ पाहणी
ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी चिकोत्रा खोऱ्यात गारपिटीने नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकूरे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, माजी पं. स. सदस्य शशिकांत खोत, सरपंच प्रदीप पाटील, सागर पाटील, सरपंच राजश्री पाटील, विशाल कुंभार आदींसह शेतकरी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.