उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन द्या, इपीएफ पेन्शनरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:12 PM2020-02-06T12:12:54+5:302020-02-06T12:16:46+5:30
कोल्हापूर : सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवरची तगमग..वयामुळे क्षीण झालेल्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा... किमान उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी सर्व ...
कोल्हापूर : सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवरची तगमग..वयामुळे क्षीण झालेल्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा... किमान उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीने कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील पेन्शनधारकांनी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ई.पी.एस. ९५ पेन्शनरांची पेन्शन किमान तीन हजार रुपये व महागाई भत्ता यासाठी विशेष तरतूद करा, या मागणीसाठी आॅल इंडिया को-आॅर्डिनेशन कमिटीच्या आदेशानुसार या मोर्चाचे आयोजन केले होते. विक्रमनगर हायस्कूल येथून या मोर्र्चास प्रारंभ झाला.
पेन्शन आमच्या हक्काची; नाही कोणाच्या बापाची, पेन्शनर एकजुटीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देत मोर्चास प्रारंभ झाला. अनेकजण हातांमध्ये प्रलंबित मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले. मध्यवर्ती बसस्थानक, सासने मैदान मार्ग, भविष्यनिर्वाह निधी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली. प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मोर्चात विडी उद्योग, एस.टी. महामंडळ, साखर कारखाने, सहकारी बँका, वीज महामंडळ अशा एकूण १८६ आस्थापनांमध्ये काम करणारे निवृत्तिवेतनधारक सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व अतूल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, गोपाळ पाटील, बाबा कोकणे, इमाम राऊत, विलास चव्हाण, तुकाराम तळप, प्रकाश पाटील, शामराव पाटील आदींनी केले.
प्रमुख मागण्या
- नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता द्या.
- पेन्शनधारकांना मोफत धान्य, वैद्यकीय सेवा द्या.
- विक्री केलेल्या पेन्शन रकमेची भरपाई द्या.
- कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी व एक्स्मेट युनिटना सुप्रीम कोर्ट निर्णयाचा फायदा द्या..
- पेन्शर खात्याला झिरो बॅलन्स मिळाला पाहिजे.
- कोशियारी समितीच्या शिफारशी लागू करा.
नागरिकत्व कायद्यास विरोध
मोर्चाच्या प्रारंभी नागरिकत्व कायद्यास विरोध करण्यात आला. राज्यघटना झिंदाबाद, समता झिंदाबाद अशाही घोषणा देण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी दसरा चौक येथे ‘आम्ही भारतीय लोकआंदोलन’ च्या वतीने होणाऱ्या धरणे आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतुल दिघे यांनी केले.
गेली दहा वर्षांपासून आम्ही आमच्या हक्कांसाठी आंदोलन करीत आहोत. बजेटमधून आमच्या हातामध्ये काहीच आले नाही. आता आम्ही आंदोलन तीव्र करणार आहे.
- गोपाळ पाटील,
सांगली जिल्हाध्यक्ष
निवृत्तिवेतन किती मिळते, हे सांगायलाही लाज वाटते. या वयात खाण्यास कमी आणि औषधे, इतर प्राथमिक गरजांसाठी अधिक खर्च येतो. निवृत्तिवेतनात किमान तो खर्च भागू शकेल, याचा विचार करावा.
इमाम राऊत, कोल्हापूर
महिन्याच्या दवाखान्याच्या गोळ्या पण या पेन्शनमधून भागत नाहीत. शासनाकडे आमच्या हक्कांची जी रक्कम पडून आहे, तिच्या व्याजातून आम्हाला महिन्याला किमान सहा ते सात हजार रुपये मिळू शकतात.
- निवास नलवडे, कोल्हापूर
अनेक ज्येष्ठांना महिन्याला दवाखान्याला दोन हजार रुपये लागतात. निवृत्तिवेतनातून तो खर्चदेखील भागत नाही. मोफत रेशनधान्य, एस.टी. सवलत, मोफत आरोग्यसेवा मिळाली पाहिजे.
- सुभाष पाटील, सांगली,