कमी खर्चात दर्जेदार आरोग्यसेवा द्या

By admin | Published: March 18, 2015 12:16 AM2015-03-18T00:16:23+5:302015-03-18T00:53:11+5:30

एम. एम. शर्मा यांचे आवाहन : आर. व्ही. भोसले, एम. बी. पाटील ‘डी. एस्सी.’ पदवीने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात

Provide quality healthcare at a low cost | कमी खर्चात दर्जेदार आरोग्यसेवा द्या

कमी खर्चात दर्जेदार आरोग्यसेवा द्या

Next

कोल्हापूर : भारतातील विविध आजारांचे उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान तसेच संधीदेखील आपल्यासमोर आहे. त्यामुळे पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार वैद्यकीय सेवा कमी खर्चात कशी उपलब्ध करता येईल त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी संचालक डॉ. एम. एम. शर्मा यांनी मंगळवारी येथे केले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांना डॉ. शर्मा, तर कर्नाटकचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांना माजी राज्यपाल डॉ. पाटील यांच्या हस्ते सन्मानदर्शक डॉक्टर आॅफ सायन्स् (डी. एस्सी.) पदवी प्रदान करण्यात आली. उत्साही वातावरणात दीक्षान्त समारंभ पार पडला.
डॉ. शर्मा म्हणाले, आपल्या देशातील दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे, याची आठवण ठेवून वैद्यकीय व्यावसायिकांनी ध्येयवाद, नैतिकतेने आपल्या व्यवसायात कार्यरत राहावे. बाबा आमटे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आदिवासी, ग्रामीण भागात केलेले काम लक्षात ठेवले पाहिजे. डॉ. भटकर यांनी उत्तम दर्जाचे संगणकीकरण कमी खर्चात कसे उपलब्ध होऊ शकते हे दाखवून दिले. गरिबांची सेवा करा, त्यांचे आशीर्वाद मिळतील.
कुलपती डॉ. भटकर म्हणाले, पदवीधरांनो, आज तुम्ही काही क्षण मागे वळून पाहा, थांबा. आपले आई-वडील, शिक्षक, मित्र-परिवार, नातेवाईक यांनी आपल्यासाठी काय केले याचे स्मरण करा. डॉ. भोसले, डॉ. शर्मा आणि डॉ. डी. वाय. पाटील हे आपल्यासाठी ‘रोलमॉडेल’ आहेत. ज्यावेळी कोणत्या मार्गावरून चालू असा प्रश्न पडेल, त्यावेळी सर्वोत्तम व्यक्तींच्या मार्गावरून जाण्याचा निर्णय घ्या.
कोल्हापूरसारख्या अन्य ग्रामीण भागातील विद्यार्थी नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यात उत्तम कामगिरी करीत आहेत. त्यामुळे हे शतक भारताचे असेल. आपण जगाचे नेतृत्व करू आणि हे ध्येय साध्य होईपर्यंत एक क्षणभरही थांबू नका.
डॉ. भोसले म्हणाले, कुटुंबात मी सर्वांत लहान होतो. मला शिक्षण पूर्ण करण्यासाठी बंधूंनी चांगली मदत केली. विद्यार्थी ते ज्येष्ठ संशोधकपदापर्यंतच्या प्रवासात मला ज्यांचे मार्गदर्शन लाभले, त्या सर्वांचे आभार मानतो.
जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, दर्जेदार शिक्षण संस्था उभी करणे कठीण काम आहे; पण ते डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाने मला सन्मानित केलेली डी. एस्सी. पदवी माझ्या वडिलांना समर्पित करतो.
माजी राज्यपाल डॉ. पाटील म्हणाले, स्वत:च्या क्षमतेचा विचार करून कष्ट करा. परमेश्वर तुम्हाला निश्चितपणे साथ देईल. द्वेष, मत्सर, राग, अहंकार अशा भावना मनातून काढून टाका, तरच तुम्हाला अधिक चांगले यश मिळविता येईल.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, अल्पावधीतच विद्यापीठाने चांगली वाटचाल केली आहे. डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय पाटील आणि सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ यशोशिखराच्या दिशेने आगेकूच करीत आहे.
दीक्षान्त सोहळ्याची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. तत्पूर्वी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राजाराम माने, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, शिवाजी विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक महेश काकडे, शांतादेवी पाटील, वैजयंती पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, विजया भोसले, व्ही. एम. चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, डी. ए. पाटील, चंद्रकांत बोंद्रे, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


सुवर्णपदक विजेते...
सोहळ्यात चैतन्य चौहानला ‘डॉ. डी. पी. बी. जहागीरदार एक्सलन्स् अवॉर्ड’ देऊन गौरविले. सचिन ओतारी, प्राजक्ता शेटे, दीपाली निकम (एक्सलन्स् रिसर्च अवॉर्ड), शालिनी लोहान, अश्विनी चव्हाण, अश्विनी पेडणेकर, नबनीत मुजुमदार, प्रियांका मिसाळ (सुवर्णपदक विजेते) यांना प्रमुखांच्या हस्ते पदवी, पदक प्रदान केले.

आर्युमान वाढीत संशोधनाचा मोठा वाटा
मूलभूत संशोधनाचा वैद्यकीय क्षेत्राला फायदा झाल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. संशोधनात एक्स-रेचा शोध, भुलीचे तंत्रज्ञान, एमआरआय, ग्लुकोमीटर, डीएनए तपासणी आदींचा समावेश आहे. आपल्या देशातील सरासरी आर्युमान वाढण्यात विविध क्षेत्रांतील संशोधनाचा मोठा वाटा आहे.

Web Title: Provide quality healthcare at a low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.