यंत्रमाग उद्योगासाठी अकराशे कोटींचे अनुदान द्यावे
By admin | Published: August 1, 2016 12:46 AM2016-08-01T00:46:38+5:302016-08-01T00:46:38+5:30
प्रकाश आवाडे यांचे आवाहन : विधानसभेतील लक्षवेधीमुळे आंदोलन स्थगित
इचलकरंजी : देशात असलेल्या यंत्रमाग उद्योगांपैकी निम्म्याहून अधिक यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. सध्या हा उद्योग अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे एक रुपये दराने वीज आणि उद्योगासाठी आवश्यक कर्जावर पाच टक्के व्याजाची सवलत इतके मागणे यंत्रमागधारकांचे आहे. याकरिता कमाल ११०० कोटी रुपये अनुदान शासनाला द्यावे लागेल; पण सध्याच्या शासनाचे या उद्योगाकडे दुर्लक्ष होत आहे. तरी यंत्रमागधारकांनी आपल्या आंदोलनाची धार वाढविली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी रविवारी केले.
यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने नवसंजीवनी द्यावी, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन केले आहे. रविवारी आंदोलकांसमोर आवाडे यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, शासनाकडे हक्काने मागणी केली तरच त्याकडे शासन लक्ष देणार आहे.
आवाडे समिती नेमली असता तत्कालीन शासनाने समितीच्या शिफारशी स्वीकारून यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणली. आता हाळवणकर समिती नेमली असूनसुद्धा या समितीने शासनाकडे कोणत्या शिफारशी केल्या? आणि त्या शिफारशींचे काय झाले? याचा खुलासा आमदारांनी करावा. निदान आम्ही त्यांना नावे ठेवत आहे म्हणून त्यांनी इर्ष्येने शासनाकडून सवलती मिळवून घ्याव्यात, आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू.
यावेळी माजी नगरसेवक सागर चाळके यांनीही आपल्या भाषणात गेल्या दोन वर्षांमध्ये शासनाने अडचणीत आलेल्या या उद्योगासाठी काहीही केलेले नाही, असे सांगून आमदार हाळवणकर हे स्वत: यंत्रमाग उद्योजक असताना त्यांच्याच शहरातील यंत्रमागधारकांना आंदोलन करावे लागते, ही नामुष्कीची गोष्ट आहे, अशीही टीका त्यांनी केली. यावेळी ‘पीडीएक्सएल’चे विश्वनाथ अग्रवाल, उद्योगपती सतीश डाळ्या, आवाडे जनता बॅँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर, पॉवरलूम असोसिएशनचे दत्तात्रय कनोजे, रफिक खानापुरे, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, विधानसभा अधिवेशनामध्ये यंत्रमाग उद्योगाविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर
उद्या, मंगळवारी चर्चा होणार असून, त्यामध्ये शासन सकारात्मक भूमिका घेईल, असा निरोप आमदार हाळवणकर यांनी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अजित जाधव यांच्याकडून आंदोलकांकडे पाठवून दिला.
त्यामुळे आमदारांच्या विनंतीला मान देऊन १५ आॅगस्टपर्यंत सध्या सुरू असलेले यंत्रमागधारकांचे आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय या आंदोलनाचे निमंत्रक जीवन बरगे यांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)
आमदारांनी जाहीर वाच्यता करावी
शनिवारी (दि. ३०) आंदोलनकर्त्यांसमोर भाषण करताना आमदार हाळवणकर यांनी यंत्रमाग उद्योजकांच्या आंदोलनात राजकारण आणू नका. आंदोलनामुळे या उद्योगाची वाट लागली आहे, अशी टीका केली. त्याची दखल घेत माजी मंत्री आवाडे म्हणाले, कॉँग्रेससह कोणत्याही पक्षाने यंत्रमाग उद्योगाबाबत कसलेही राजकारण केलेले नाही. राजकारण कोण करीत आहे, याची जाहीर वाच्यता आमदारांनी करावी. साप-साप म्हणून जमीन धोपटण्याचे काम त्यांनी करू नये.
यंत्रमागधारकांसमोर संघर्ष हाच पर्याय
विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर याबाबत शासनाची भूमिका पाहून इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने पुढाकार घेत यंत्रमाग उद्योगातील सर्व संघटनांची व्यापक बैठक घ्यावी. शासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्यास यंत्रमागधारकांसमोर रस्त्यावरील संघर्ष करण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नाही, असे आंदोलन मागे घेताना सागर चाळके यांनी सूचित केले.