गडहिंग्लज विभागातील पूरग्रस्तांना भरीव मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:51+5:302021-08-02T04:09:51+5:30
गडहिंग्लज : अतिवृष्टी व महापुरामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात सुमारे ५०० कोटीचे नुकसान झाले आहे. ...
गडहिंग्लज : अतिवृष्टी व महापुरामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात सुमारे ५०० कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योजक आदी पूरबाधितांना शासनाने भरीव मदत करावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर दौऱ्यात आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना समक्ष निवेदन देऊन गडहिंग्लज विभागातील पूरहानीबाबतची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, २०१९ आणि यावेळच्या महापुरातही नदीकाठावरील शेतीपंपाचे आणि ऊस, भात, सोयाबीन, नाचणी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उचंगी, सर्फनाला व किटवडे हे धरणप्रकल्प निधी व पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे अनेक वर्षापासून रखडले आहेत. वारंवार येणाऱ्या महापुराची तीव्रता कमी होण्यासाठी या प्रकल्पांच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रमुख मागण्या अशा :
हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नदीतील गाळ काढण्यास परवानगी द्या.
- महापुरात बुडालेले कृषीपंप व विद्युत मोटारचीही भरपाई द्या.
- नांगनूरनजीकचा कर्नाटकचा जुना बंधारा काढण्यासाठी जलसंपदा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवा.
फोटो ओळी : कोल्हापूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमदार राजेश पाटील यांनी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
क्रमांक : ०१०८२०२१-गड-०१