२५० कोटींची तरतूद
By Admin | Published: February 4, 2017 12:45 AM2017-02-04T00:45:15+5:302017-02-04T00:45:15+5:30
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग : कामाला मिळणार गती; कऱ्हाड-चिपळूणसाठी ३०० कोटी
कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने या मार्गासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवाय हातकणंगले-इचलकरंजी या आठ किलोमीटरच्या नव्या मार्गाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी याबाबतची माहिती प्रसिद्ध केली.
गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये पूर्ण झाले. शिवाय त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे महामंडळाला सादर करण्यात आला.
याबाबत कोल्हापुरातील विविध घटकांनी केलेल्या पाठपुराव्यांमुळे या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यतादेखील मिळाली. यावर्षी अर्थसंकल्पात संबंधित मार्गाच्या कामासाठी निधीची उपलब्धता, काही नव्या मार्गाची कोल्हापूरकरांना अपेक्षा होती. त्यातील कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने अधिकृतरित्या जाहीर केली आहे. या मार्गाचे सर्वेक्षणानंतर त्याच्या कामासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने सरकारला सादर केला आहे. या निधी मंजुरीमुळे संबंधित मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. हातकणंगले ते इचलकरंजी या सुमारे ८ किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्ग आणि त्यासाठी १६० कोटी रुपयांच्या निधीला देखील तत्त्वत: मान्यता अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. कराड-चिपळूण रेल्वेमार्गाला ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात कोल्हापूरच्यादृष्टीने दोन महत्त्वाचे निर्णय झाल्याने नागरिक, व्यापारी-उद्योजक आणि रेल्वेच्या घटकांकडून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
‘हातकणंगले-इचलकरंजी’साठी या मार्गाची शक्यता
हातकणंगले-इचलकरंजी या नव्या मार्गाने इचलकरंजीच्या विकासाला हातभार लागणार आहे. हा नवा मार्ग हातकणंगले-कोरोची-पंचगंगा साखर कारखान्याची मागील बाजू-शहापूर-इचलकरंजी असा राहण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले.
संभ्रमावस्था दूर झाली
केंद्रीय आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्रित सादर झाल्याने रेल्वेकडून कोल्हापूरसाठी काय मिळाले? याबाबत येथील रेल्वेसंबंधित घटकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी दुपारनंतर अर्थसंकल्पातील योजना, निधी मंजुरी, आदींची माहिती देणारे ‘पिंकबुक’ आॅनलाईन प्रसिद्ध केल्यानंतर ती दूर झाली.
..........................
सरकारकडून निधी मंजुरीचे पाऊल पडल्याने कोल्हापूर-वैभववाडीच्या कामाला गती मिळेल. हातकणंगले-इचलकरंजी या नव्या मार्गाने येथील विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल.
- मोहन शेटे, सदस्य, पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समिती
प्रकल्पाचा खर्च सुमारे ३२०० कोटी
कोल्हापूर-वैभववाडी हा सुमारे १०७ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग आहे. यासाठी एकूण ३२४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे.
इचलकरंजी रेल्वेच्या नकाशावर
सध्या इचलकरंजी परिसरातील नागरिक आणि व्यापारी-उद्योजकांना त्यांची मालवाहतूक रेल्वेद्वारे करण्यासाठी हातकणंगले येथे यावे लागते. त्यांच्या सोयीसाठी कऱ्हाड-बेळगांव हा मार्ग व्हाया इस्लामपूर, इचलकरंजीकडून नेण्याची मागणी होती. त्यावर सरकारने आता हातकणंगले-इचलकरंजी या ८ किलोमीटरच्या नव्या मार्गाला तत्त्वत: मान्यता देऊन चांगला निर्णय घेतला आहे. यासाठी १६० कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या मार्गामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर असलेली इचलकरंजी रेल्वेच्या नकाशावर होणार आहे शिवाय हा मार्ग इचलकरंजीतील वस्त्रोद्योग, अन्य व्यापार-व्यवसाय आणि नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.
कोल्हापूर-वैभववाडी, कऱ्हाड-चिपळूण मार्गांसाठी निधीची मंजुरी आणि हातकणंगले-इचलकरंजी या नव्या मार्गाला तत्त्वत: मंजुरी देण्याचा निर्णय कोल्हापूरसाठी महत्त्वाचा आहे. येथील विकासाला याद्वारे चालना मिळणार आहे.
- कृष्णात पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे.
सरकारने कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी रेल्वेबाबत चांगला निर्णय घेतला आहे. कोल्हापूर रेल्वेस्थानकावरील लिफ्ट, एक्सलरेटर, प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक अॅप्रन, आदी कामांसाठी निधीची उपलब्धता, नवीन एक-दोन रेल्वे सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- समीर शेठ, सदस्य, मध्य रेल्वे विभागीय समिती.
पाठपुराव्याला यश : यावर्षी अर्थसंकल्पात कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद झाली. त्यामुळे आता लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, याबाबतच्या माझ्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून, याद्वारे कोल्हापूर आणि कोकणमधील व्यापार, पर्यटनामध्ये मोठी वाढ होईल. हातकणंगले-इचलकरंजी या नव्या मार्गाचा वस्त्रनगरी इचलकरंजीला मोठा लाभ होणार आहे. या निर्णयाबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे मी आभार मानतो.