रस्त्यांसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद, कामे १५ दिवसांत करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 03:08 PM2019-11-08T15:08:11+5:302019-11-08T15:09:20+5:30
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी हा आदेश दिला.
कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी हा आदेश दिला.
सभापती देशमुख यांनी पावसामुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी सर्वसाधारण रस्ता अनुदानातून ७५ लाख, प्रत्येक सदस्याच्या ऐच्छिक पॅचवर्क निधीमधून ५० हजारांप्रमाणे ४० लाख व महापालिका स्वनिधीमधून ४७ लाख अशी एकूण एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून दिली.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सध्या महापालिकेमार्फत पॅचवर्कची कामे सुरू असून प्लँटवर डांबराचा साठाही पुरेसा ठेवण्यात आला आहे. महापालिकेकडे पुनर्पृष्ठीकरणाच्या कामासाठी कर्मचारी अपुरे पडत असल्याने ही कामे पूर्ण करण्यासाठी एक-दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या तत्काळ पुनर्पृष्ठीकरणासाठी अल्प मुदतीची निविदा आजच प्रसिद्ध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय कार्यालयनिहाय निविदाही प्रसिद्ध करीत असल्याचे ते म्हणाले. या कामाची निविदा अंतिम झाल्यावर किमान पाच ते आठ ठेकेदारांमार्फत शहरात एकाच वेळी कामे सुरू करता येतील, असेही सरनोबत यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, गटनेता नियाज खान, नगरसेवक संजय मोहिते, राजाराम गायकवाड, नगरसेविका सविता भालकर, गीता गुरव, भाग्यश्री शेटके, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.