जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १५ कोटी, मनकर्णिकासाठी दीड कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:33+5:302021-03-10T04:25:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने आगामी वर्षात जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १५ ...

Provision of Rs. 15 crore for Jotiba Temple Pilgrimage Development Plan and Rs. 1.5 crore for Mankarnika | जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १५ कोटी, मनकर्णिकासाठी दीड कोटींची तरतूद

जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १५ कोटी, मनकर्णिकासाठी दीड कोटींची तरतूद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने आगामी वर्षात जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १५ कोटी आणि अंबाबाई मंदिराच्या आवारात उत्खनन सुरू असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या जतन संवर्धनासाठी दीड कोटींची तरतूद केली आहे. समितीच्या मंगळवारी झालेल्या अंदाजपत्रकीय वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वर्षातील खर्च व आगामी वर्षातील जमा-खर्चाचे अंदाजपत्रक मांडण्यात आले. आगामी वर्षात ३५ कोटींचा निधी जमा व ३१ कोटींचा निधी खर्ची पडण्याचा अंदाज आहे.

समितीच्या कोल्हापुरातील कार्यालयात अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सचिव विजय पोवार यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई उपस्थित होते. या अंदाजपत्रकीय आराखड्यासाठी सहायक सचिव सौ. शीतल इंगवले, लेखापाल धैर्यशील तिवले यांचे सहकार्य लाभले. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी शिवाजीराव साळवी, प्रभारी उपअभियंता सुयश पाटील उपस्थित होते.

आगामी वर्षासाठी समितीच्या जमेच्या अंदाजपत्रकात ३५ कोटी ५२ लाख २८ हजार ९५९ इतक्या रकमेची तरतूद केली असून, त्यात जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठीचे १५ कोटी रुपये आहेत. शासनाच्या विशेष योजनेतून हा विकास आराखडा राबविला जात असून, शासनाकडून यावर्षी ८ ते १० कोटी आणि देवस्थान समितीच्या निधीतील ५ कोटी अशी ही तरतूद आहे. या निधीतून जोतिबा मंदिराचे जतन संवर्धन, सीसीटीव्ही, फायर सिस्टीम, भिंती-ओवऱ्या, काळभैरी मंदिर परिसरात विकास कामे केली जाणार आहेत.

सध्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर आले असून, पाण्याचे जिवंत झरे सापडेपर्यंत खोदकाम सुरू राहणार आहे. त्यानंतरही या पुरातन बांधकामाची झालेली पडझड व जतन संवर्धन करावे लागणार असून, त्यासाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तसेच सामाजिक सेवा निधीसाठी दीड कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

---

नऊ महिन्यांत १२ कोटी खर्च

गतवर्षी कोरोना महामारीमुळे समितीचा मोठा निधी खर्ची पडला असून, एप्रिल ते डिसेंबरअखेर हा खर्च १२ कोटी ३५ लाख, ८२ हजार ६२१ इतका झाला आहे. मार्चअखेर ही आकडेवारी २२ कोटी ६५ लाख ४ हजार १३० इतकी जाण्याचा अंदाज आहे.

--------------------

कोट....

भक्तांना सुलभ, सहज, स्वच्छ वातावरणात जोतिबा व अंबाबाईचे दर्शन घेता यावे, त्यांच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात आल्या आहेत. अधिक चांगल्या नियोजनासाठी समिती कार्यरत राहील.

-विजय पोवार, सचिव

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर.

Web Title: Provision of Rs. 15 crore for Jotiba Temple Pilgrimage Development Plan and Rs. 1.5 crore for Mankarnika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.