जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांसाठी २०० कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:39+5:302021-03-09T04:27:39+5:30
कोल्हापूर : राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेल्या धामणी मध्यम ...
कोल्हापूर : राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. याचबरोबर जिल्ह्यातील दूधगंगा, नागणवाडी आणि आजरा तालुक्यांतील उचंगी, सर्फनाला आणि आंबेओहोळ प्रकल्पांसाठीही निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. आबिटकर म्हणाले, या प्रकल्पाचे काम सुरू करण्याकरिता केलेल्या पाठपुराव्यांमुळे प्रकल्पास ७८२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेता आली. परंतु, जुन्या ठेकेदाराचे देणे असल्यामुळे निविदा प्रसिद्ध करण्यास अडथळे निर्माण झाले होते. मात्र, यातूनही मार्ग काढण्यात आला. आता १०० कोटी रुपयांची तरतूद झाल्याने लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
याबरोबरीने दूधगंगा आंतरराज्य प्रकल्पाकरिता ४० कोटी, सर्फनाला प्रकल्पासाठी ३० कोटी, नागणवाडी लघू पाटबंधारे प्रकल्पाकरिता १० कोटी, उचंगी प्रकल्पासाठी १० कोटी, आंबेआहोळ प्रकल्पासाठी १० कोटी १० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. यातील धामणी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे, तर उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला या प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी निधीअभावी आणि पुनर्वसनाअभावी ही कामे थांबली आहेत. त्याला गती येण्याची शक्यता आहे.