सूक्ष्म सिंचनासाठी ३४६ कोटींची तरतूद

By admin | Published: February 18, 2015 11:11 PM2015-02-18T23:11:11+5:302015-02-18T23:44:15+5:30

२० फेब्रुवारीपर्यंत मुदत : आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

A provision of Rs. 346 crores for micro irrigation | सूक्ष्म सिंचनासाठी ३४६ कोटींची तरतूद

सूक्ष्म सिंचनासाठी ३४६ कोटींची तरतूद

Next

प्रकाश पाटील - कोपार्डे - राज्य कृषी विभागामार्फत चालू वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन राज्य कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. चालू वर्षात सूक्ष्म सिंचन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी ( दि. २० फेब्रुवारी) आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतीवरील पाणी व्यवस्थापन या उपअभियानाद्वारे राज्यात यंदा सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-ठिबक प्रणालीमध्ये आॅनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तपासणी करून अनुदानाची परिगणना करून जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २० फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे.
यासाठी ई-ठिबकवर आॅनलाईन नोंदणी करताना विहित नमुन्यात अर्ज करावयाचे असून यासाठी माती व पाणी परीक्षणाचा अहवाल, संच बसवलेल्या क्षेत्राचा सातबारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्रासह बॅँकेतील खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडावी लागणार आहे.


कृषी वृद्धीसाठी राज्याची तरतूद
राज्यातील सूक्ष्म सिंचनासाठी यंदा ३४६ कोटी ८७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचनासाठी चालू वर्षासाठी केंद्र सरकारने १७७.५० कोटी रुपये व राज्य शासनाने ४४.३७ कोटी रुपये अशी एकूण २२१.८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली असून, त्यासाठी २५ कोटी रुपयांचा राज्य शासनाचा हिस्सा जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दोन्ही निधीतून यंदा ३४६.८७ कोटी रुपयांची तरतूद सूक्ष्म सिंचनासाठी करण्यात आली आहे.

Web Title: A provision of Rs. 346 crores for micro irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.