गरिबीशी झुंजत सुजाता झाली पीएसआय

By admin | Published: June 19, 2015 11:28 PM2015-06-19T23:28:22+5:302015-06-20T00:34:48+5:30

कवठेएकंदची कन्या : प्रेरणादायी यश, तरुणांपुढे ठेवला आदर्श

PSI to fight poverty | गरिबीशी झुंजत सुजाता झाली पीएसआय

गरिबीशी झुंजत सुजाता झाली पीएसआय

Next

प्रदीप पोतदार- कवठेएकंद -भरकटलेली तरुण पिढी, अभ्यासाच्या आणि शिक्षणाच्या नावावर उधळपट्टी करणारे विद्यार्थी, कुटुंब, समाज आणि माणुसकीबद्दल आस्था नसणारे युवक, अशी स्थिती सर्वत्र दिसत असताना, कवठेएकंद (ता. तासगाव) येथील सुजाता या तरुणीने गरिबीशी झुंज देत मोठ्या जिद्दीने पीएसआय परीक्षेत बाजी मारली. सुजाता शिवाजी पाटील हिने कवठेएकंदच्या इतिहासात पहिली पोलीस उपनिरीक्षक बनून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दगड-मातीचं चारखणी छोटंसं घर, वडिलोपार्जित एक एकर शेती, यावरच आई-वडिलांच्या श्रमातून कुटुंब चालायचं. परिस्थितीमुळे लहान भाऊ बालपणापासूनच मामाकडे शिकायला. आई, वडिलांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नाहीत, अशी जिद्द उराशी बाळगून सुजाताने दहावीपर्यंतचे शिक्षण कवठेएकंद येथे, तर बारावी सायन्सचे शिक्षण तासगावमधून पूर्ण केले. विज्ञान शाखेत तिने ६० टक्के गुण प्राप्त केले. त्यानंतर मामाच्या मदतीने ती मुंबईला गेली. २००९ मध्ये पोलीस भरती परीक्षेत जेमतेम उत्तीर्ण होऊन अवघ्या १९ व्या वर्षी पोलीस शिपाई म्हणून नोकरीला लागली. बोरीवली (ईस्ट) येथे कार्यरत असताना विशेष प्रावीण्यही प्राप्त केले. २०१३ मध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली, पण यश आले नाही. पुन्हा २०१४ च्या पीएसआय परीक्षेत मात्र ४३० पैकी १९१ गुण मिळवून ती यशस्वी झाली. राज्यात तिने ६ व्या क्रमांकाचे यश प्राप्त केले.
वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रसेवेत रूजू होत असल्याचे सांगून, परिस्थितीनुसार घडत गेले, अशी बोलकी व नेमकी प्रतिक्रिया तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. आई, वडिलांनी शेती आणि मोलमजुुरी करून सुजाताला प्रोत्साहन दिले. घरची काळजी न करता तिच्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी पैसा खर्च केला.
जनावरांचे संगोपन करून आई सुमन पाटील यांनी कुटुंबाला आधार देऊन सुजाताला घडविले. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. सुजाताने परिस्थितीशी संघर्ष करून मिळविलेले हे यश युवक-युवतींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.


आईचे कष्ट सार्थकी
आईच्या कष्टामुळे प्रेरणा मिळाली. परिस्थितीशी झगडत गरजा पूर्ण केल्या. आईचे कष्ट सार्थकी लागले, अशी भावना सुजाताने व्यक्त केली.

Web Title: PSI to fight poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.