भंगार गोळा करणाऱ्याचा मुलगा झाला पीएसआय- कष्टकरी कुटुंबाला लाभली गुणवत्तेची श्रीमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:40 AM2019-03-12T00:40:33+5:302019-03-12T00:41:17+5:30
इंग्रजीचे अन् माझं वांद. दहावीत मला इंग्रजीला ३५ गुण मिळाले, पण हाच विषय मी परफेक्ट केला. बारावी ६२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. कला शाखेचा पदवीधर. इंग्रजी विषय ठेवून डिस्टिंक्शनने पास झालो. घरी
खोची : इंग्रजीचे अन् माझं वांद. दहावीत मला इंग्रजीला ३५ गुण मिळाले, पण हाच विषय मी परफेक्ट केला. बारावी ६२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. कला शाखेचा पदवीधर. इंग्रजी विषय ठेवून डिस्टिंक्शनने पास झालो. घरी कमालीचे दारिद्र्य होते. या दारिद्र्यानेच मला स्वस्थ बसू दिले नाही. अभ्यासात सातत्य ठेवले. त्यामुळेच पीएसआय परीक्षेत एनटी ‘ब’ मध्ये राज्यात पाचवा क्रमांक आला.
गावोगावी भंगार गोळा करीत मला शिक्षण देण्यासाठी माझ्या बापानं घेतलेल्या मेहनतीला यश मिळवून दिले याचं सर्वोच्च समाधान मिळाले आहे, अशी भावना हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील श्रीकांत मोहन वासुदेव याने व्यक्त केली.गावच्या पश्चिमेला वासुदेव बागडी समाजाची छोटी वस्ती आहे. मोलमजुरी, मच्छिमारी करणारी कुटुंबे जास्त आहेत. नोकरदार, शिकलेले असे अल्प प्रमाण आहे. अत्यंत साध्या राहणीमानातील ही वस्ती आहे. श्रीकांतचे आई, वडील, विवाहित भाऊ शासनाकडून मिळालेल्या छोट्याशा घरकुलात राहतात. शेती फक्त अडीच गुंठे. त्यामुळे भंगार गोळा करीत कुटुंबांचा चरितार्थ चालतो. वडिलांची तब्येत बरोबर नसल्याने भाऊ भंगार गोळा करून वडिलांना कामात हातभार लावत आहे. अशा परिस्थितीत माझ्या शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत करताना कधी हात आखडता घेतला नाही. वडिलांनी डोळ्याचे आॅपरेशनसुद्धा मागे ठेवले. पुण्यातील क्लाससाठी, भोजन, निवास व्यवस्था यासाठी तुटपुंज्या मिळकतीतूनही मला आवश्यक ते पैसे पाठवून दिले.
ही परिस्थिती व माझ्यातील जिद्द मला सतत चार्ज करीत राहिली. अनेक वेळा मला आजारपण आले. अशावेळी मित्रांनी मला पुण्यात मोलाचे सहकार्य केले. मी तयारी करीत होतो उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी परीक्षेत अव्वल यायचे यासाठी; परंतु मध्यंतरी असा विचार आला की, आपली परिस्थिती पाहता नोकरी करीत ही तयारी करूया. त्याप्रमाणे मी पीएसआयची परीक्षा दिली. वास्तविक ही परीक्षा देण्यापाठीमागे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे ऐकलेले भाषणही प्रेरणादायी ठरले होते. मी पेठवडगाव येथे कॉलेजला होतो त्यावेळी कॉलेज व स्टँड परिसरात दंगा करणाऱ्या मुलांना पोलिसी खाक्या दाखवण्यासाठी पोलीस येत होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांचा प्रचंड दबदबा होता. त्यांच्या भीतीने सर्वांची पळापळ व्हायची. तेव्हासुद्धा ठरविले होते की,आपण पण इन्स्पेक्टर व्हायचं. या दोन बाबींनी माझं लक्ष अधिक केंद्रित केले. एनटी ‘ब’मध्ये राज्यात पाचवा आलो. डीवायएसपी व्हायचं आहे. यापुढे जोमाने प्रयत्न करीत राहणार आहे.
मला सुरुवातीला मार्गदर्शक म्हणून कृष्णात वासुदेव यांनी दिशा दिली. शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही. त्याचे महत्त्व समजावून सांगून ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करीत राहणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. भेंडवडे गावातील पीएसआय परीक्षेत यश मिळविणारा तो पहिलाच आहे. त्याचे अभिनंदन करण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत.