‘वरद’ हत्याप्रकरणी आरोपीची केली मनोवैज्ञानिक चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:28+5:302021-09-15T04:29:28+5:30
कोल्हापूर : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. ...
कोल्हापूर : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. सोनाळी) याने हत्येची कबुली दिली, तरीही हत्या नेमकी कशासाठी केली याचे गूढ अद्याप उकललेले नाही. त्यामुळे संशयित आरोपीची मंगळवारी नवी मुंबईत मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. संशयिताची नार्को चाचणी करण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य याला अटक केली. हत्येला प्रथम नरबळीचा रंग देण्यात आला. नंतर हे नरबळी नसल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीने वरद या बालकाची हत्या करण्यामागचे कारण शोधण्यात पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. हत्या प्रकरणाला महिना उलटला तरीही नेमके कारणाचे गूढ उकललेले नाही. संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य याची मानसिकता तपासणीसाठी सोमवारी रात्री त्याला कडेकोट बंदोबस्तात पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे हे घेऊन नवी मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता नवी मुंबईत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्याच्यावर मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आली. सुमारे दोन ते अडीच तास ही चाचणी घेण्यात आली. चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागणार आहे. कोणत्याही गंभीर अगर क्रूर गुन्ह्यात आरोपीची पोलिसांमार्फत मनोवैज्ञानिक चाचणी अग्रक्रमाने केली जाते. त्याच पद्धतीने ही चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली. तूर्त तरी नार्को चाचणी करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तपास स्थानिक पोलिसांमार्फतच
हत्याप्रकरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही स्थानिक पोलिसांकडून योग्य पद्धतीने व गतीने तपास सुरु आहे. तपास कामाबाबत गोपनीयता पाळली जात आहे, तरीही हत्येचे गूढ लवकरच उलगडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.