मनोरुग्णांनी फोडले सहा हजारांचे फटाके !
By admin | Published: July 29, 2016 10:16 PM2016-07-29T22:16:44+5:302016-07-29T22:17:17+5:30
एवढ्या रकमेचं करायचं काय, हे न सूचल्याने या मनोरुग्णांनी चक्क सहा हजार रुपयांचे फटाके फोडून जल्लोष केला आणि एका चोरीचे गूढ उकलले.
ऑनलाइन लोकमत
इचलकरंजी, दि. 29 - दोघेही मनोरुग्ण...त्यात त्यांनी घरफोडी करून चोरलेले सव्वा लाख रुपये हातात...एवढ्या रकमेचं करायचं काय, हे न सूचल्याने या मनोरुग्णांनी चक्क सहा हजार रुपयांचे फटाके फोडून जल्लोष केला आणि एका चोरीचे गूढ उकलले.
मनोरुग्ण जोडीतील एकाचे नाव बजरंग शिवराम साखरे (वय १९) असून, दुसरा अल्पवयीन आहे. दोघांनी एका सुरक्षारक्षकाचे घर फोडून एक लाख १५ हजारांची रोकड लंपास केली. पण चोरीतून मिळालेल्या या सव्वा लाख रुपयांचे करायचे काय, हे न सूचल्याने अनेकांना ते ‘घबाड’ दाखवत सुटले. त्यांचा हा बावळटपणा लक्षात येताच काहींनी त्यांच्याकडील रकमेवर हात मारला. उर्वरित रकमेतून एकाने चप्पल खरेदी केली, तर दुसऱ्याने सहा हजार रुपयांचे फटाके फोडले.
चोरीतून मिळालेले घबाड घेऊन ते चौका-चौकात फटाके फोडत फिरले. अनेकांची करमणूक झाली. पण पोलिसांना संशय आल्याने त्यांना पोलीस चौकीत नेऊन दम भरला असता घरफोडीतून हे पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगून टाकले. एका घरफोडीचा तपास लागल्याचे समाधान मिळाले, पण असे मनोरुग्ण गुन्हे करू लागले तर काय, असा प्रश्न पोलिसांना पडला.