‘प्रदूषण’कडून ‘एसटीपी’चा पंचनामा

By admin | Published: February 6, 2015 12:59 AM2015-02-06T00:59:24+5:302015-02-06T01:03:48+5:30

‘प्रजासत्ताक’च्या तक्रारीची दखल : अहवाल न्यायालयात सादर करणार, नमुने घेतले

'PTC' of 'STP' from 'Pollution' | ‘प्रदूषण’कडून ‘एसटीपी’चा पंचनामा

‘प्रदूषण’कडून ‘एसटीपी’चा पंचनामा

Next

कोल्हापूर : कसबा बावडा येथील महापालिकेच्या घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (एसटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली. प्रक्रियापूर्वी व नंतरचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. एसटीपी कें द्राची क्षमता ७६ दक्षलक्ष लिटर असूनही काहीअंशीच केंद्र सुरू असल्याचा निष्कर्ष मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काढला. केंद्राबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच उच्च न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुळे यांनी यावेळी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला ३१ जानेवारीपर्यंत एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे केली होती. त्यानुसार आजच्या तपासणीवेळी महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे, याचिकाकर्ते दिलीप देसाई, पर्यावरण तज्ज्ञ व समिती सदस्य उदय गायकवाड, पर्यावरण अभियंता एस. के. पाटील, उपजल अभियंता एस. बी. कुलकणी, ‘एसटीपी’ची उभारणी करणारे ‘विश्वा इन्फ्रा’चे अधिकारी उपस्थित होते.
मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित व प्रक्रिया केलेले पाणी चाचणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रयोगशाळेतील उपकरणे बंदच स्थितीत आहेत. क्लोरिनेशनचे काम अद्याप होत नाही. केंद्रातील २० चेंबर्सपैकी फक्त सहा चेंबर्सचे काम पूर्ण झाले आहे. पंप हाऊसचे कामही पूर्ण झालेले नाही. प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यासाठीची पाईप अद्याप अपूर्णच असल्याने परिसरातील शेतात सांडपाणी मिसळते, आदींची गंभीर दखल प्रदूषण मंडळाने घेतली आहे. पाणी परीक्षण अहवालानंतर मंडळातर्फे सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'PTC' of 'STP' from 'Pollution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.