पीटीएमकडून साईनाथचा धुव्वा
By admin | Published: February 6, 2015 12:29 AM2015-02-06T00:29:29+5:302015-02-06T00:41:49+5:30
अवधूत घारगे स्मृतिचषक : दिलबहार (ब)चा प्रॅक्टिसला धक्का
कोल्हापूर : पाटाकाडील तालीम मंडळ ‘अ’ने साईनाथ स्पोर्टस्वर ७-१ अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर टायब्रेकरवर मात करीत अवधूत राजेंद्र घारगे स्मृतिचषक सीनिअर फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.छत्रपती शाहू स्टेडियमवर गुरुवारी सामन्याचे उद्घाटन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते कै. अवधूत घारगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. याप्रसंगी करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, निवृत्त उपअधीक्षक जयवंत देशमुख, नौशाद बोबडे, माणिक मंडलिक, संयोजन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, राजेंद्र घारगे, उमेश सावंत, दीपक घारगे, श्रीकांत मोहिते, नेताजी डोंगरे, सुनील ठोंबरे, आदी उपस्थित होते. स्पर्धेचे निवेदन विजय साळोखे यांनी केले.
पहिला सामना पीटीएम ‘अ’ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. १८ व्या मिनिटाला पीटीएम ‘अ’च्या उत्सव मरळकरने गोल करीत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ २२ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. या आघाडीनंतर पीटीएम ‘अ’ने अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. पाठोपाठ २९ व्या मिनिटाला धैर्यशील पवार व ३२ व्या मिनिटाला दीपक थोरातने गोल करीत मध्यंतरापर्यंत सामन्यात ४-० अशी आघाडी घेतली.
उत्तरार्धात पीटीएम ‘अ’कडून ५१ व्या मिनिटाला राहुल नलवडेने आणि ५४ व्या मिनिटाला निजाय पटेलने गोल करत सामन्यात ६-० अशी भक्कम आघाडी घेतली. ७० व्या मिनिटाला साईनाथ स्पोर्टस्च्या अनिकेत चौगुलेने गोल करीत आघाडी कमी केली. मात्र, पीटीएम ‘अ’च्या अजिंक्य नलवडेने ७२ व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात ७-१ अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
दुसरा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यामध्ये झाला. २४ व्या मिनिटाला दिलबहार ‘ब’च्या शशांक माने याने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ २८ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’च्या राहुल पाटीलने उत्कृष्टरीत्या बायसिकल कीकवर गोल नोंदवत सामना १-१ असा बरोबरीत आणला. पाठोपाठ ३३ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’च्या सुमित घाटगेने गोल नोंदवत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. जादा वेळेत दिलबहार ‘ब’च्या सुशील मानेने गोल नोंदवत मध्यांतरापर्यंत सामना २-२ असा बरोबरीत केला.
उत्तरार्धात दिलबहार ‘ब’कडून आदित्य मानेने पेनल्टीवर गोल केला. पाठोपाठ ७९ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’कडून अभिनव साळोखेने गोल नोंदवत सामना ३-३ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. सामन्याचा निकाल लावण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये सामन्यात दिलबहार ‘ब’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ४-३ अशा गोलफरकाने विजय मिळविला.