‘पीटीएम’ची ‘दिलबहार’वर मात

By admin | Published: May 21, 2016 12:36 AM2016-05-21T00:36:48+5:302016-05-21T01:00:01+5:30

घारगे स्मृतिचषक : पाटाकडील-बालगोपाल उद्या अंतिम सामना

'Ptm' defeats Dilbahar | ‘पीटीएम’ची ‘दिलबहार’वर मात

‘पीटीएम’ची ‘दिलबहार’वर मात

Next

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ (अ)(पीटीएम)ने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ (अ)चा अटीतटीच्या सामन्यात १-० असा पराभव करीत अवधूत घारगे स्मृतिचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या, रविवारी ‘पाटाकडील अ’ची लढत बालगोपाल तालीम संघाशी होणार आहे.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी पाटाकडील (अ) व दिलबहार (अ) यांच्यात स्पर्धेतील उपांत्य सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (अ)च्या अनिकेत तोरस्कर, सनी सणगर, जावेद जमादार, गोन्साल्वीस, राहुल तळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत पाटाकडील (अ) च्या गोलक्षेत्रात धडक मारीत गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग गोलरक्षक शैलेश पाटील व बचावफळीने त्यांच्या गोल करण्याच्या संधी परतावून लावल्या. १९ व्या मिनिटास दिलबहार(अ) च्या गोलक्षेत्रात पाटाकडील (अ)च्या वृषभ ढेरे याने फ्री किकवर मारलेल्या चेंडूवर नियंत्रण करीत अक्षय मेथे-पाटीलने गोल करण्यास सरसावला. दरम्यान, चेंडू गोलजाळ्यात जाणार इतक्यात ‘दिलबहार’च्या नीलेश जाधवने चेंडू अवैधरीत्या हाताने बाहेर काढला. मुख्य पंचांनी पाटाकडील (अ) ला पेनल्टी बहाल केली. यावर अक्षय मेथे-पाटीलने अचूक गोल नोंदवीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात काही काळ ‘दिलबहार’ने चढाया केल्या.
उत्तरार्धात एका गोलने पिछाडीवर असलेल्या दिलबहार (अ) संघाने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. दिलबहार (अ)च्या सनी सणगर, जावेद जमादार, सचिन पाटील यांचे प्रयत्न पाटाकडील (अ)च्या बचावफळीने वारंवार फोल ठरविले. अखेरच्या काही वेळात दोन्ही संघांचा खेळ आक्रमक व वेगवान झाला. दोन्हीकडून आक्रमण-प्रतिआक्रमण झाले. पाटाकडील (अ) च्या ओंकार जाधवने दिलबहारच्या गोलक्षेत्रात मारलेला चेंडू परतविण्याचा प्रयत्नात दिलबहार (अ) चा बचावपटू अभिजित शिंदे याचा फटका उलट दिशेने जात स्वयंगोल होता-होता वाचला. पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील याने दिलबहार (अ) च्या सचिन पाटील, जावेद जमादार, सनी सणगर, अनिकेत जाधव, संग्राम थोरवडे यांचे गोल करण्याचे प्रयत्न वारंवार हाणून पाडले. अखेरच्या क्षणांत दिलबहार (अ) च्या सचिन पाटीलला गोल करण्याची सोपी संधी मिळाली. मात्र या संधीचा लाभ त्याला उठविता आला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांकडून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ झाला. १-० अशी आघाडी कायम राखत हा सामना पाटाकडील (अ) ने जिंकत स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. उद्या, रविवारी अंतिम फेरीत पाटाकडील (अ)चा सामना बालगोपाल तालीम मंडळाशी होणार आहे.

Web Title: 'Ptm' defeats Dilbahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.