पीटीएम, दिलबहार पुढील फेरीत अटल चषक फुटबॉल स्पर्धा : उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, पोलीस संघ पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:05 AM2018-04-03T00:05:43+5:302018-04-03T00:05:43+5:30
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने कोल्हापूर पोलीस संघावर १-० अशा गोलफरकाने मात केली.
राजर्षी छत्रपती शाहू स्टेडियमवर पहिला सामना पीटीएम ‘अ’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. सामन्यात प्रारंभापासून पीटीएम संघाने सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ‘पीटीएम’ संघाकडून हृषिकेश मेथे-पाटील याने ३३ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत ‘पीटीएम’ संघाने आघाडी कायम राखली.
उत्तरार्धात ‘उत्तरेश्वर’ संघाकडून प्रकाश संकपाळ, इंडो गिल्बर्ट, रविराज भोसले, सुयश हंडे यांच्याकडून आघाडी कमी करून खाते उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्या. यावेळी ‘पीटीएम’ संघाकडून ओंकार जाधवने ५५ व्या मिनिटाला, ७० व्या मिनिटाला हृषीकेश मेथे-पाटीलने, तर ७७ व्या मिनिटाला राजेंद्र काशीद याने गोल करत सामन्यात ४-० अशी भक्कम पकड निर्माण केली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
दुसरा सामना दिलबहार तालीम ‘अ’ विरुद्ध कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ यांच्यामध्ये झाला.
सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करण्यास सुरुवात केली. दिलबहार तालीम मंडळाकडून सनी सणगर, जावेद जमादार यांनी खोलवर चढाया करत पोलीस
संघाची बचावफळी भेदण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ३५ व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरेने
गोल करत दिलबहार संघाला मध्यंतरापर्यंत आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समन्वयाअभावी गोल करता आला नाही. शेवटपर्यंत दिलबहारची आघाडी कायम राहिली.
समर्थक गॅलरीतून कोसळला
पीटीएम विरुद्ध उत्तरेश्वर यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात ‘पीटीएम’ संघाने गोल करताच प्रेक्षक गॅलरीत बॅरिकेटवर चढून एक समर्थक नाचत होता.नाचताना तोल जाऊन तो गॅलरीतून खाली मैदानात पडला. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही, तर सामन्याच्या दरम्यान दोन्ही संघांच्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीतून अश्लील शिवीगाळ केल्याने काहीकाळ वातावरण तंग झाले होते.