‘पीटीएम’ला मिळाली फुटबॉलची झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:41 AM2019-01-28T00:41:35+5:302019-01-28T00:41:39+5:30
तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘फुटबॉल खेळाची पंढरी’ म्हणून समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात फुटबॉल म्हटलं की, पाटाकडील ...
तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘फुटबॉल खेळाची पंढरी’ म्हणून समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात फुटबॉल म्हटलं की, पाटाकडील तालीम मंडळ म्हणजेच ‘पीटीएम’चे नाव तितकेच मानाने घेतले जाते. ‘नाद खुळा - पिवळा निळा’ हे आजच्या युवा पिढीने ठेवलेले ब्रीदवाक्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयामुळे मिळालेल्या कुस्तीची परंपरा अखंडपणे जपण्यासाठी ‘पाटाकडील तालीम मंडळा’ची स्थापना झाली. कालौघात शतकोत्तराचे साक्षीदार ठरताना फुटबॉल खेळाने ‘पीटीएम’ला नवी झळाळी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रात फुटबॉल विश्वात ‘पीटीएम’ने दबदबा निर्माण केला.
राजर्षी शाहूंनी कुस्तीला राजाश्रय दिल्यामुळे ती जपण्यासाठी रसाळ यांच्या जागेत दादोबा नलवडे, गुलाबराव हकीम, चांदसो मोमीन, बापूसाहेब नलवडे, हिंदुराव भोसले, बाबूराव जाधव, जयवंतराव घाटगे, गोपाळराव शिंदे, सदाशिवराव माळी, इंगवले पैलवान, आदींनी १९०७ साली एकत्र येऊन ‘पाटाकडील तालीम मंडळा’ची छोट्याशा शेडमध्ये स्थापना केली.
त्यावेळी दादोबा नलवडे, विष्णू पोवार, बापू पखाले वस्ताद, कुष्णाजी दुबुले-जाधव हे कुस्तीतील निष्णात पैलवान होते. मंडळाच्या जागेत लाल मातीचा आखाडा केला, त्यात कुस्त्यांचा सराव होत होता. तब्बल ४९ वर्षे ही कुस्तीची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली. त्यानंतर तीनवेळा जिमचे अत्याधुनिकीकरण केले.
कमिटीची १९५६ मध्ये स्थापना करून गणेशोत्सव उत्साहात सुरू झाला. १९६० मध्ये पाटाकडील फुटबॉल संघाची स्थापना झाली. १९६२ मध्ये पहिल्या प्रयत्नातच दाभोळकर चषकावर नाव कोरले व संघ ‘सीनिअर’ बनला. त्यानंतर ‘पीटीएम’चा विजयाचा अश्व नेहमीच धावत आहे.
पिवळा-निळा टी-शर्ट आणि त्यावर गरुडभरारीचा सिम्बॉल ही ‘पीटीएम’ची नवी ओळख निर्माण झाली. कठोर परिश्रम, व्यायाम, तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ‘पीटीएम’ने अनेक खेळाडू निर्माण केले. ते राज्य आणि राष्टÑीय पातळीवर चमकत राहिले. पुण्यात मोहन बागान संघालाही नमवून त्यांनी संघाची ताकद दाखवून दिली.
.... अन् खेळामुळे
नोकºया मिळू लागल्या
संघातील खेळाडूंची चिकाटी एस.टी. महामंडळातील अधिकारी गोपाळराव घोरपडे यांनी हेरली. त्यांनी १९६३ मध्ये तातडीने बाळ इंगवले यांच्या माध्यमातून ‘पीटीएम’चे खेळाडू केरबा गौड, सुंदरसिंह रजपूत, नाना पाटील, श्रीराम भोसले यांना ‘एस. टी.’मध्ये नोकरी देऊन एस.टी. महामंडळाचा संघ स्थापन केला.
फुटबॉल संघ कार्यकारिणी
अध्यक्ष : शरद माळी, उपाध्यक्ष : त्रिवेंद्रम नलवडे, खजानीस : रावसो सरनाईक, सदस्य : श्रीनिवास जाधव, आनंदा डोणे, आनंदराव पाटील, श्रीपाद मुळे, शौकत महालकरी.
राज्य, राष्टÑीय पातळीवर
चमकलेले तालमीचे खेळाडू
संतोष तेलंग, विजय कदम, आनंदा ठोंबरे, अजिंक्य नलवडे, संभाजी जाधव, शरद माळी, श्रीनिवास जाधव, नितीन पाटील, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील, श्रीकांत पाटील, प्रथमेश ठंोंबरे, अमित सातार्डेकर, रणवीर मेथे, पवन सरनाईक, इंद्रजित चव्हाण, संदीप गोंधळे, कल्याण माळी, शाम देवणे, अनिल चोपदार, बाबासाो पाटील, रावसो सरनाईक, पांडबा जाधव, प्रथमेश हेरेकर, अक्षय मेथे, हृषिकेश मेथे, धोंडीराम कांबळे, राजू सणगर, युक्ती ठोंबरे, रोहित ठोंबरे, ओंकार जाधव, ओंकार पाटील, वृषभ ढेरे, रणजित विचारे.
पाण्याचा पाट
आणि ‘पाटाकडील’
‘पाटाकडील’ हे नाव तसे विचित्र वाटते. कळंबा तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी पद्माळामार्गे पाटाने तालमीपर्यंत येऊन तेथून ते रावणेश्वर तीर्थ (सध्याचे शाहू स्टेडियम)मध्ये जात होते. त्यामुळे या पाटावरील संस्थेचे नामकरण ‘पाटाकडील तालीम’ असे केले.