आजरा शहरात ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:10 AM2021-05-04T04:10:48+5:302021-05-04T04:10:48+5:30
आजरा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजरा नगर पंचायतीने दिनांक ४ ते ११ मे अखेर जनता कर्फ्यू लागू करण्याचा ...
आजरा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजरा नगर पंचायतीने दिनांक ४ ते ११ मे अखेर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दवाखाने व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आजरा शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व आजरा शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावणे गरजेचे होते. याविषयी सोमवारी नगर पंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील सर्व व्यवहार दिनांक ४ ते ११ मे अखेर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवार (१२) मे पासून आजरा शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील.
या बैठकीला उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेवक अशोक चराटी, संभाजी पाटील, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, सिकंदर दरवाजकर, अभिषेक शिंपी, रेश्मा सोनेखान यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
जनता कर्फ्यूच्या निर्णयावर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला न विचारता जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला कसा? जनता कर्फ्यू लावण्यापूर्वी दोन दिवस अगोदर आम्हाला का कल्पना दिली नाही? यासह अन्य प्रश्नांचा भडीमार केला. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दिवाकर नलवडे, जनार्दन टोपले यांनी केले.
आजरा परिसरातील नागरिक आजरा शहरात खरेदीसाठी येत असतात. परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आजरा शहर सुरक्षित ठेवायचे असेल तर जनता कर्फ्यूशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी याला पाठिंबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
भाजीपाला व्यापाऱ्यांची यामुळे मोठी अडचण झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवलेल्या व्यवहारात अनेकांनी मिळेल त्या किमतीला आपल्या वस्तूंची विक्री केली.
दुकान उघडल्यास ५ हजार दंड
जनता कर्फ्यूच्या काळात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून घरी सुरक्षित राहायचे आहे. एखाद्या दुकानदाराने दुकानातील वस्तूंची विक्री सुरू केल्यास त्याला ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी-पाटील यांनी दिली.