अणुऊर्जेबाबत लोकशिक्षणाची गरज
By admin | Published: June 26, 2015 12:58 AM2015-06-26T00:58:42+5:302015-06-26T00:58:42+5:30
शिवराम भोजे : राजकीय आडमुठेपणा, लोकांमधील अज्ञानापोटी अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध--राजर्षी शाहू व्याख्यानमाला
कोल्हापूर : वाढत्या लोकसंख्येमुळे ऊर्जेच्या गरजाही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अणुऊर्जेसारख्या मुबलक आणि विश्वसनीय ऊर्जा स्रोताची आज नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या तुलनेत अणुप्रकल्पांतून किफायतशीर किमतीमध्ये आणि कमी प्रदूषणामध्ये ऊर्जा उपलब्ध होते; पण राजकीय आडमुठेपणा आणि लोकांमधील अज्ञानापोटी अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध होत आहे. त्यामुळे अणुऊर्जेबाबत लोकशिक्षणाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
‘जैतापूरचा अणुप्रकल्प’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले होते.
डॉ. भोजे म्हणाले, आज कोळसा, जलविद्युत व डिझेल आदींपासून ऊर्जानिर्मिती केली जाते; परंतु हे ऊर्जानिर्मितीच्या वस्तूंचे साठे येत्या काही वर्षांत संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या ऊर्जास्रोतांना अणुपासून ऊर्जानिर्मिती हाच शाश्वत आणि मुबलक ऊर्जेचा पर्याय आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कैक पट ऊर्जा अणुभट्ट्यांमधून निर्माण करता येते. भारतात आजही ५९ टक्के वीज ही कोळशापासून निर्माण केली जाते. या ऊर्जास्रोतांमुळे प्रदूषणाची समस्या तीव्र होते; पण अणुभट्ट्यातून अतिशय नगण्य कचरा तयार होतो. शिवाय हा कचरा जमिनीमध्ये ३०० वर्षे गाडून ठेवण्याची सोय केलेली असते. त्यामुळे हा कचरा पर्यावरणामध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जपानमधील फुकुशिमा अणुभट्टीच्या स्फ ोटाच्या घटनेचा संदर्भ देत आज जैतापूर प्रकल्पाला विरोध केला जात आहे; पण कोणताही अणुप्रकल्प उभारला जात असताना भूकंप व भूकंपाची तीव्रता, चक्रीवादळ, तापमान, वाऱ्याचा वेग, समुद्राच्या लाटांची उंची, दहशतवादी हल्ले, वीज किंवा अनपेक्षित
अपघात गृहीत धरूनच त्याची रचना केली जाते. जैतापूरमधील अणुप्रकल्पामध्ये या सर्व बाबींचा विचार केला आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे, असे मतही डॉ. भोजे यांनी व्यक्त केले.
डॉ. भोजे म्हणाले, प्रकल्पांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य तो मोबदला देणे गरजेचे आहे, पण महसूल व्यवस्था भ्रष्ट असल्यामुळे आपल्याकडे प्रकल्पग्रस्तांना मोबदला वेळेवर मिळत नाही. कोयना प्रकल्पग्रस्त हे त्याचे उदाहरण आहे.
प्रकल्पग्रस्तांना आरोग्य, शिक्षण, वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा तत्त्वहीन राजकारण्याकडून पैसे उकळण्यासाठी एखाद्या प्रकल्पाला विरोध केला जातो, ही बाब
घृणास्पद आहे.
अध्यक्षीय भाषणात वसंत भोसले म्हणाले, विजेची गरज आणि उत्पादन यामध्ये गफलत झाल्यामुळे एन्रॉन बुडाला. ऊर्जेची आवश्यकता आणि उत्पादन याबाबत योग्य नियोजन करून त्याप्रमाणे आर्थिक तरतुदीची गरज प्रकल्पांसाठी आवश्यक आहे. प्रकल्पाबाबत लोकांना विश्वासात घ्यायला कमी पडता कामा नये. शहरांचा विकास करताना पायाभूत सुविधांबाबत शास्त्रशुद्ध आणि नेमके धोरण आवश्यक आहे. चुकीच्या निर्णयामुळेच प्रकल्पासाठी खर्च झालेली किंमत आणि संबंधित कंपनीकडून होणारी वसुली यात करोडोंचा फरक आढळतो, ही
बाब कोल्हापूरने टोलच्या रूपाने अनुभवली आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांशी खेळण्याचा मूर्खपणा थांबवला पाहिजे.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक
चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी )