लोककलावंतांचे दर्शन ग्रामीण भागात दुर्मीळ

By admin | Published: October 27, 2014 09:16 PM2014-10-27T21:16:42+5:302014-10-27T23:43:37+5:30

कला विस्मृतीत : नवीन पिढीचा नकार

Public exhibitions are rare in the rural areas | लोककलावंतांचे दर्शन ग्रामीण भागात दुर्मीळ

लोककलावंतांचे दर्शन ग्रामीण भागात दुर्मीळ

Next

पुनवत : ग्रामीण भागात सुगीच्या दिवसात येऊन लोकांची करमणूक करुन वर्षाकाठीचा आपल्या हक्काचा धान्याचा वाटा मागणारे लोककलावंत काळाच्या ओघात आता दुर्मीळ झाल्यामुळे ग्रामीण गाववाड्यातील आनंद हरवत चालला आहे. सतत बदलत जाणारी सामाजिक स्थिती व नव्या पिढीचा आधुनिक दृष्टिकोन, यामुळेच लोककलावंतांची कला लोप पावत चालली आहे.
ग्रामीण भागात पूर्वीचे सुगीचे दिवस किती मजेदार असायचे. गावा-गावात निघणारी खळी, खळ्यावर धान्याच्या राशी, दिवसभर दमून-भागून पिकांची काढणी, मळणी करणारे शेतकरी, सायंकाळी केली जाणारी मळणी, मळणीत चालणारा पैरा व दुसऱ्या दिवशी दारावर किंवा खळ्यावर हमखास टपकणारा एखादा लोककलावंत, हे चित्र आता विस्मृतीत जाऊ लागले आहे.
ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी किंवा लोकजागृतीसाठी नंदीवाला, कडकलक्ष्मी, मदारी, दरवेशी, गारुडी, पोतराज, बहुरुपी, वासुदेव, डोंबारी, कोंबड्याचा खेळ करणारा गोपाळ, हलगीवाला, वाघ्यामुरळी, पिंगळा जोशी, कुडमुडे जोशी, ज्योतिषी, नवनाथ जोगती, गोंधळी असे एक ना अनेक कलावंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोकांची करमणूक करुन आपल्या हक्काचा धान्याचा वाटा मागायचे. लोकांना आशीर्वाद देत पुढच्या वर्षी नक्की येण्याचे आश्वासन देऊन आपल्या गावाकडे वळायचे. काळाच्या ओघात ग्रामीण भागातील हे चित्र आता मागे पडले आहे. खवरेवाडी (ता. शिराळा) येथे एकट्याच आलेल्या, कोंबड्याचा खेळ करणाऱ्या गोपाळाला सहज विचारले, ‘‘दादा, एकटाच आलास, तुझा कोंबडा (मुलगा) कुठाय?’’ त्यावर तो सफाईदारपणे म्हणाला, ‘‘साहेब, कोंबडा आता मोठा झालाय. नवीन पिढीत हे काम करायला कोण तयार न्हाय. म्हणून एकटाच आलो.’’
कलावंतांच्या समाजातही आधुनिकतेचे वारे घुसल्याने त्यांची नवीन पिढीतील मुलं नोकरी, धंद्याकडे वळाल्याने, लोककलावंतांचं येणं दुर्मीळ झाले आहे. ग्रामीण समाजजीवनातील लोककलावंतांची कला काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Public exhibitions are rare in the rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.