कोल्हापूर जिल्ह्यात 'सार्वजनिक सूचना यंत्रणा' बसवणार : पालकमंत्री पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 03:19 PM2021-12-09T15:19:35+5:302021-12-09T15:20:15+5:30
अशा प्रकारची यंत्रणा बसविणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : आणीबाणीच्या प्रसंगी नागरीकांना सजग करण्यासह जनजागृती करण्याच्या हेतूने कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ७१० सार्वजनिक सूचना यंत्रणा (पब्लिक अड्रेस सिस्टीम) बसविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापैकी महानगरपालिका हद्दीत ६० ठिकाणी सार्वजनिक सूचना यंत्रणा बसविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरीकांना तातडीने काही सूचना देऊन सावध करायचे असेल तर सध्या कोणतीच यंत्रणा नाही. अतिवृष्टी, महापूर, भूकंप किंवा दंगली या सारख्या प्रसंगी जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासनाला नागरीकांशी थेट संवाद साधून योग्य माहिती पोहचविणे, त्यांना सजग करणे, यासारख्या कारणांनी ही सार्वजनिक सूचना यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
एखादी घटना घडली की समाज माध्यमावर चुकीच्या माहितीचा झपाट्याने प्रसार केला जातो. अशा वेळी नेमकी आणि खरी माहिती नागरीकांना मिळत नाही. म्हणूनच पब्लिक अड्रेस सिस्टीमचा वापर करुन नागरीकांपर्यंत योग्य माहिती पोहचविली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.