कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावरून लोकसभेचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 08:40 PM2019-03-08T20:40:12+5:302019-03-08T20:42:33+5:30
लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच कोल्हापूर जिल्'ात प्रचाराने जोर धरला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी आयोजित सत्कार आणि पुरस्कार वितरण समारंभामध्ये
कोल्हापूर : लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच कोल्हापूर जिल्'ात प्रचाराने जोर धरला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी आयोजित सत्कार आणि पुरस्कार वितरण समारंभामध्ये सर्वपक्षियांदेखत खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्याला लोकसभेसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
यावेळी अधिकारी, कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार, सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका पुरस्कार आणि जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रामकृष्ण हॉल येथे आयोजित कार्यक्रमाला जिल्'ातील ‘आशां’नी गर्दी केली होती.यावेळी आरोग्य सभापती सर्जेराव पाटील (पेरिडकर), शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पा आळतेकर, मंगल कांबळे, हंबीरराव पाटील, महेश चौगुले, गगनबावड्याचे उपसभापती पाटील, प्रकाश टोणपे उपस्थित होते.
शौमिका महाडिक म्हणाल्या, अनेक वेळा आम्ही राजकीय मंडळी निवडणुकांपुरते दोन महिने घरोघरी जातो. मात्र तुम्ही ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी रोज घरोघरी जाता. गेल्या वेळी लोकसभेला तुम्ही ज्यांंच्यावर विश्वास टाकलात, तो त्यांनी कामातून सार्थ ठरविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे, अशा शब्दांत धनंजय महाडिक यांचे नाव न घेता शौमिका महाडिक यांनी आवाहन केले.
धनंजय महाडिक म्हणाले, आरोग्य क्षेत्रामध्ये कोल्हापूरला आघाडीवर ठेवण्याचे काम तुम्ही सर्वांनी केले आहे. तुमचे सर्व प्रश्न मला माहिती आहेत. त्यामुळे कोल्हापूरपासून ते दिल्लीपर्यंत हे प्रश्न मी सातत्याने मांडले आहेत. तुमचा एक भाऊ लोकसभेत तुमच्यासाठी भांडतोय, हे लक्षात ठेवा. महाडिक दिलेला शब्द पाळतात म्हणून आम्हांला राजकारणामध्ये किंमत आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी प्रास्ताविक केले. ‘आशा’ संघटनेच्या अध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी ‘आशा’ स्वयंसेविकेच्या विविध मागण्या मांडल्या. डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. उत्तम मदने, डॉ. फारुख देसाई, जोशी, सातोसे, पाटील, सोनवणे, डॉ. स्मिता खंदारे, नितीन लोहार, नसीमा खान यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले.
यावेळी गोवर रुबेला लसीकरणाचे उत्तम काम केल्याबद्दल डॉ. फारूक देसाई, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अनिल कवठेकर, डॉ. एन. एस. माळी, डॉ. जेसिका अॅँड्र्यूज, डॉ. बी. डी. सोमजाळ, पर्यवेक्षक मधुकर पाटील, नर्सिंग आॅफिसर एस. एम. गुरव, आरोग्य सहायक एम. एस. देशपांडे, एस. डी. टाकळकर, के. एस. पाटील, बांबवडे, भेडसगाव आणि पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रे, औषध निर्माण अधिकारी संभाजी कुपटे, चौगुले, प्रणाली पाटील यांच्यासह विविध कर्मचारी ‘आशां’चा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर दवाखान्यात का थांबत नाहीत ?
जेव्हा आमचे ग्रामस्थ, शेतकरी शेतामध्ये काम करीत असतात तेव्हा आपले डॉक्टर दवाखान्यात असतात. मात्र जेव्हा संध्याकाळी शेतकरी गावात येतात तेव्हा डॉक्टर दवाखान्यात नसतात. त्यांचे खासगी दवाखाने मात्र त्यामुळे त्याच वेळेत जोरात चालतात. याबाबत आदेश काढूनही त्याचे पालन होत नसल्याची खंत यावेळी गटनेते अरुण इंगवले यांनी बोलून दाखविली.