अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी प्रदीप घरत सरकारी वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:42 PM2019-05-15T19:42:41+5:302019-05-15T19:44:30+5:30
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. ...
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती केली आहे. बिद्रे हत्याकांडला आतातरी न्याय द्या, या मागणीचे निवेदन बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरूंदकर (रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरूंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, कुरूंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली आहे.
फळणीकर याने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली आहे. संशयित भंडारी याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अलिबाग न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नकोत, त्यांच्याऐवजी प्रदीप घरत यांची नियुक्ती करावी म्हणून दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनाकडे आणि न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाने अॅड. घरत यांची नियुक्ती केली. त्यांनी हिट आणि रन या केसमध्ये सलमान खानला शिक्षा लावली आहे.
पत्रकार जे. डे. हत्याकांडातील आरोपी छोटा राजनला प्रदेशातून आणून शिक्षा लावली. बिद्रे हत्याकांडमधील आरोपींना ते शिक्षा लावतील, अशी आशा बिद्रे-गोरे कुटुंबीयांना आहे. म्हणूनच त्यांनी त्यांची मागणी केली होती. सहायक सरकारी वकील म्हणून रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती केली आहे.
अश्विनीचे वडील माजी सैनिक जयकुमार आण्णासो बिद्रे यांनी आतापर्यंत तपास योग्य रितीने झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही.
कदाचित यापुढे त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जाईल. तसेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास त्यासही मुख्यमंत्री जबाबदार राहतील. दिवसेंदिवस तपासात विलंब न लावता आतातरी बिद्रे हत्याकांडला न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन राजू गोरे व जयकुमार बिद्रे यांनी दिले आहे.