‘शाहू चरित्रा’च्या हिंदी आवृत्तीचे रविवारी प्रकाशन
By admin | Published: June 23, 2016 12:55 AM2016-06-23T00:55:44+5:302016-06-23T01:05:08+5:30
शाहू जयंती : शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन सोहळा
कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराज चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे रविवारी (दि. २६) प्रकाशन होणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथाचे प्रकाशन होईल. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख उपस्थित असतील. कोल्हापुरातील महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्थेमार्फत डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हा विविध भाषांमध्ये प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित ग्रंथाचा हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. अनुवादाचे हे काम हिंदी विभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
शाहू जयंतीनिमित्त रविवारी रॅली
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २६) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून रॅलीचे आयोजन केल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी दिली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता दसरा चौक येथून रॅलीस सुरुवात होईल.
शाहूराजांच्या छायाचित्राचे प्रदर्शन
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने रविवार (दि. २६)पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रे व कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवन येथे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला. अशा या महापुरुषाचे चरित्र कथन करणाऱ्या इतिहासावर या प्रदर्शनाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे.