मॉरिशसच्या विश्व हिंदी संमेलनात मराठी पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:15 PM2018-08-28T13:15:20+5:302018-08-28T13:17:55+5:30
मॉरिशस येथे भरलेल्या ११ व्या विश्व हिंदी संमेलनामध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘वाचन’ या मराठी पुस्तकाचे सन्मानपूर्वक प्रकाशन स्वीडन येथील उप्साला विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हाईन्स वसलर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथील विश्व हिंदी सचिवालयाचे महासचिव डॉ. विनोदकुमार मिश्र होते.
कोल्हापूर : मॉरिशस येथे भरलेल्या ११ व्या विश्व हिंदी संमेलनामध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘वाचन’ या मराठी पुस्तकाचे सन्मानपूर्वक प्रकाशन स्वीडन येथील उप्साला विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हाईन्स वसलर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथील विश्व हिंदी सचिवालयाचे महासचिव डॉ. विनोदकुमार मिश्र होते.
मॉरिशसमधील पोर्ट लुईस येथे १८ ते २0 आॅगस्ट या दरम्यान हे विश्व हिंदी संमेलन पार पडले. विश्व हिंदी सचिवालयाच्या नुक त्याच उभारण्यात आलेल्या विशाल भवनातील सभागृहामधील हा पहिलाच पुस्तक प्रकाशन समारंभ होता आणि हा मान एका मराठी पुस्तकाला मिळाला. यावेळी डॉ. हाईन्स वसलर म्हणाले, जागतिकीकरणाच्या गतीत वाचन हरवते आहे. अशा काळात वाचनाचा शास्त्रीय विचार आवश्यक आहे; त्यामुळेच वाचक प्रगल्भ होऊ शकेल.
प्रा. विनोद मेंधी यांनी यावेळी मराठी येत नसतानाही या पुस्तकातील एका परिच्छेदाचे उत्स्फूर्त वाचन केले आणि त्याचा लगेचच हिंदी अनुवादही केला. ते म्हणाले, मराठी आणि हिंदी या भाषाभगिनी असून दोन्ही भाषांमध्ये ८0 टक्के शब्द समान आहेत. फक्त ऱ्हस्व, दीर्घ आणि क्रियापद रूपे भिन्न आहेत. वाचनाची व्याकरणीकता समान असल्याने हे पुस्तक उभयपक्षी समान भारतीय भाषी केवळ वाचन नाही तर समजू पण शकतात.
या समारंभावेळी फिजीचे भारतीय उच्चायुक्त, फिजीचे शिष्टमंडळ सदस्य, महात्मा गांधी संस्थान मॉरिशसचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विनय गुदारी, बुडापेस्ट विद्यापीठाचे हिंदी विभागप्रमुख प्रा. पीटर शानी, गोहाटी विद्यापीठ आसामचे प्रा. दिलीप मैंधी, मिझोराम विद्यापीठातील प्रा. सुशीलकुमार शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनासाठी ४0 देशांचे २000 प्रतिनिधी उपस्थित होते.
पुस्तक अनिल मेहता यांना अर्पण
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांना त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अर्पण केले आहे. भाग्यश्री प्रकाशनाच्या संचालिका भाग्यश्री पाटील यांनी त्यांचे पहिले प्रकाशन जागतिक मंचावर प्रकाशित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या पुस्तक निर्मितीसाठी ‘अक्षरदालन’ चे अमेय जोशी, चित्रकार गौरीश सोनार यांचे सहकार्य लाभले.