पिसाळलेल्या कुत्र्याचा गडहिंग्लजमध्ये धुमाकूळ
By admin | Published: June 22, 2017 01:19 AM2017-06-22T01:19:31+5:302017-06-22T01:19:31+5:30
दोन विद्यार्थ्यांसह पाचजणांना चावालोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : येथे सकाळी अकराच्या सुमारास गजबजलेल्या दसरा चौक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण पाचजण जखमी झाले. विशेष म्हणजे त्यानंतर तो कुत्रा आर्श्चयकारकरीत्या गायब झाला असून, नगरपरिषदेच्या १२ कर्मचाऱ्यांनी शोध घेऊनही तो कुठेच आढळला नाही.
सागर कल्लाप्पा पाटील (वय २०, रा. कवळीकट्टी), श्रावण मनोहर कांबळे (१७, रा. दुंडगे) या दोन महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच काशीबाई पांडुरंग पावले (६०, रा. बहिरेवाडी), गुरूलिंग महादेव जंगम (६५, रा. बहिरेवाडी) व शिवगोंडा कलगोंडा पाटील (६०, रा. भडगाव) अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. बसस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप तसेच भडगाव रोडवर १० ते १५ मिनिटादरम्यान त्या कुत्र्याने सर्वांच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले; पण तो सापडला नाही.
जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ‘अॅण्टी रॅबीज व्हॅक्सीन’ ही प्राथमिक लसही रुग्णालयात उपलब्ध नव्हती. ती खासगीतून खरेदी करून उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, तो कुत्रा पिसाळलेला असल्याने त्यासाठी ‘इक्वी रॅब’ ही लस देणे गरजेचे असून, ती जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप आंबोळे यांनी स्पष्ट केले. पण, सर्वांनीच त्यासाठी कोल्हापूरला जाण्याऐवजी ती लस स्व:खर्चाने खासगी मेडीकलमधून खरेदी करून डॉक्टरांना पुरविल्याने सर्व रुग्णांवर येथील उपजिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.