पूजा अन् गीतासाठी सरसावले अनेक हात!
By admin | Published: April 17, 2015 11:06 PM2015-04-17T23:06:33+5:302015-04-18T00:06:15+5:30
‘लोकमत’ची दखल : उपचारासाठी कोल्हापूरला नेले--लोकमतचा प्रभाव
भुर्इंज : अतिगंभीर भाजूनही उपचाराविना स्वत:च्या झोपडीत तडफडणाऱ्या पूजा व गीताची करुण कहाणी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह थेट परदेशातून मदतीचे हात सरसावले आहेत. मदतीचे हात पुढे करणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय कार्यकर्ते, नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, अधिकारी यांच्यापासून भारताच्या राजदूतांचा समावेश आहे. मात्र, ज्या गावात पूजा व गीता भाजल्या त्या ओझर्डेतील ग्रामस्थ व यात्रा कमिटीने या दोघींना ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी रुग्णालयात दाखल केले आहे.
तब्बल दहा दिवसांपूर्वी ओझर्डे, ता. वाई येथे यात्रेच्या छबिन्यात दारूकामावेळी झालेल्या स्फोटात पूजा रामदास पवार (वय ५) आणि गीता रामदास पवार (वय ९) या दोघी अतिगंभीर जखमी झाल्या होत्या; मात्र या दोघी अतिशय गरीब आणि अशिक्षित कुटुंबातील असल्याने त्यांना चांगल्या उपचारासाठी पुणे येथे नेता आले नाही. पूजा व गीताचा सांभाळ करणाऱ्या आजीची तशी परिस्थितीही नव्हती. त्यामुळे सातारा, तरडगाव नंतर या दोघींना भुर्इंज येथे पत्र्याच्या झोपडीत आणून ठेवले. या ठिकाणी जणू या दोघींच्या मृत्यूची वाट पाहिली जात होती. पैशाअभावी रुग्णालयात उपचार करता येत नसल्याने झोपडीत तडफडणाऱ्या पूजा व गीताची कैफियत ‘लोकमत’ने मांडताच माणुसकीचा जणू सागरच उसळला.
प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ‘लोकमत’मधील वृत्त पाहताच थेट भुर्इंज गाठले. पूजा व गीताला पाहून खेबूडकर हेलावून गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचारासाठी प्रयत्न सुरू केले. या दरम्यान भारताचे थायलंडमधील राजदूत राजेश स्वामी, वाई राष्ट्रवादी युवकाचे अध्यक्ष मामा देशमुख, वाई तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष अतुल जाधव-इनामदार, किशोर रोकडे, मधुकर शिंदे, जयवंत पवार, शामराव भोसले, अजय माळवदे, विनीत खरे, प्रशांत भोसले-पाटील यांच्यासह तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पूजा व गीताच्या उपचारासाठी मदतीची विचारणा झाली. सातारचे संजीवन हॉस्पिटलचे मनोज वाघ यांनीही या दोघींवर हॉस्पिटलचे व्यवस्थापन उपचारासाठी तयार असल्याचे कळवले. मात्र, ओझर्डे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने पुढाकार घेत दोघींच्या उपचाराची व्यवस्था केली. (वार्ताहर)
अनेकांची जबाबदारी घेण्याची तयारी
पूजा व गीतावर उपचार व्हावेत, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले व त्यांचे सहकारी या दोघींच्या घरी जाऊन आले. उपचारासाठीच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याचेही तयारी त्यांनी दर्शवली होती. मजूर फेडरेशनचे सतीश भोसले यांनी मुंबई येथील रुग्णालय व धर्मादाय संस्थाशी संपर्क साधण्याची तयारी दर्शवली होती.