Navratri2022: पाचव्या माळेला अंबाबाईची अंबारीतील पूजा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 30, 2022 03:51 PM2022-09-30T15:51:27+5:302022-09-30T15:53:02+5:30
अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला विशेष महत्व
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला ललिता पंचमी निमित्त आज, शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अंबारीतील पूजा बांधण्यात आली. यादिवशी अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जात असते. तिथे मोठी यात्रा भरते. या सोहळ्यासाठी ती अंबारीत बसून निघाली आहे असा या पूजेचा अन्वयार्थ आहे.
अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला विशेष महत्व आहे. अंबाबाईने कोल्हासुराचा वध केल्यानंतर पुढे त्याचा नातू कामाक्षने कपिलमुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने अंबाबाईसह सर्व देवतांचे बकऱ्यात रुपांतर केले. हे कळताच त्र्यंबोली देवीने योगदंड कामाक्षाकडून घेत त्याचा वध केला व सर्वांची सुटका केली. पण अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले, त्यामुळे ती रुसून अंबाबाईकडे पाठ करून टेकडीवर जाऊन बसली.
ही चूक लक्षात येताच अंबाबाई आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला गेली. तिथे कोल्हासुराचा वध कसा केला हे त्र्यंबोली देवीला काेहळ्याच्या माध्यमातून दाखवले. तसेच आशिर्वाद दिला की दरवर्षी ललिता पंचमीला मी तुझ्या भेटीला येईन. त्याप्रमाणे आजही ही परंपरा सुरू आहे. ही पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.