Navratri 2024: दुसऱ्या माळेला अंबाबाई गजेंद्रलक्ष्मी रूपात, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 4, 2024 04:35 PM2024-10-04T16:35:35+5:302024-10-04T16:37:30+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवीच्या ...

Puja of Karveer resident Shri Ambabai as Gajendralakshmi on Friday, the second garland of Navratri festival | Navratri 2024: दुसऱ्या माळेला अंबाबाई गजेंद्रलक्ष्मी रूपात, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवीच्या आराधनेचा दिवस मानला जात असल्याने या दिवशी सकाळपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी दर्शन रांग शेतकरी संघाच्या इमारतीत गेली. अन्य शहरातील भाविकांनी भरलेले बसेसच्या कोल्हापुरात दाखल झाले होते.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दुसऱ्या दिवशी गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. देव व असूर यांच्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने निघाली त्यात पहिली निघाली ती लक्ष्मी, हिला कमलालक्ष्मी देखील म्हणतात. हिला गजेंद्रलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणतात, कारण ही देवी जेव्हा समुद्रमंथनातून उत्पन्न झाली, तेव्हा तिला हत्तींनी अमृतकुंभाने अभिषेक केला. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्व सौभाग्य देणारी देवता आहे. हिच्या उपासनेने गजांत धन व समृद्धी लाभते. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतिक म्हणून या देवीची उपासना करतात. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर यांनी बांधली.

शुक्रवारी नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस होता. घराघरांमध्ये घटस्थापना झाल्याने महिला आता देवदर्शनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळेच शुक्रवारी पहाटेपासून अंबाबाई मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी मंदिर आणि बाह्य परिसरातदेखील अलोट गर्दी होती.

विधानसभेचा परिणाम

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आजी-माजी आमदारांच्या वतीने महिला मतदारांसाठी देवी दर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून आला. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी दर्शन रांग भवानी मंडपातील शेतकरी बझारच्या इमारतीपर्यंत गेली. आज शनिवार व रविवारी सलग सुट्ट्या असल्याने त्याहून अधिक गर्दी असणार आहे.

Web Title: Puja of Karveer resident Shri Ambabai as Gajendralakshmi on Friday, the second garland of Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.