पालेभाज्या महागल्या, कोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; दुधाची तहान ताकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:29 AM2019-08-16T11:29:16+5:302019-08-16T11:33:50+5:30
गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
रोजच्या जेवणात नियमितपणे अनेकांना भाजीपाला असल्याशिवाय जेवण जात नाही. मात्र, अशा खवय्यांना गेल्या आठवडाभरात केवळ आणि केवळ कडधान्यांचे मोड आलेले उसळ, आमटीवरच पालेभाजीची तल्लफ भागवावी लागत आहे. अशा या कडधान्यांमध्ये स्वयंपाक त्वरित होणारा पदार्थ म्हणून मसूरडाळ सध्या जोर सुरू आहे.
पूरग्रस्तांच्या पातळ भाजीमध्ये हाच पदार्थ अधिक दिसत आहे. याशिवाय मूग, चवळी अशा कडधान्यांची उसळ जेवणात हमखास दिसत आहे. या कडधान्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात मसूर ६० रुपये नियमित, तर बेळगावी १२० ते १३० रुपये असा प्रतिकिलो दर आहे.
मटकी १२०, तर मूग ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे आहे. हाच दर किरकोळ व्यापाऱ्यांकडे दहा ते वीस रुपये जादा दराने ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल असे कडधान्य खरेदीकडे वाढला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविली जात आहे. दर कमी असल्याने अशा प्रकारची भाजी रोजच्या जेवणात हमखास मेन्यू बनली आहे.