पलूसमध्ये दोन गटांत धुमश्चक्री
By admin | Published: May 10, 2017 11:35 PM2017-05-10T23:35:32+5:302017-05-10T23:35:32+5:30
दळवी-येसुगडे गट भिडले : जुन्या बसस्थानक चौकात तुफान दगडफेक; सहायक पोलीस निरीक्षक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पलूस शहरातील पाणीटंचाईबाबत सोमवारी झालेल्या सभेतील वाद बुधवारी पुन्हा उफाळून आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खाशाबा दळवी व स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे प्रमुख विठ्ठल ऊर्फ बापूसाहेब येसुगडे यांचे गट समोरासमोर भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने जुन्या बसस्थानक चौकात वातावरण तणावपूर्ण बनले.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना पांगविल्याने अनर्थ टळला. दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांतील ३४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पलूस नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली. चौरंगी लढतीत काँग्रेस व स्वाभिमानी रयत विकास आघाडीमध्ये चुरस होती. त्यात काँग्रेसने बाजी मारली. मात्र, निवडणुकीपासून खाशाबा दळवी व बापूसाहेब येसुगडे गटात संघर्ष सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर त्यात आणखी भर पडली. या संघर्षाचे पडसाद नगरपालिकेत वेळोवेळी दिसून येत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून पलूस शहरासह तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष राजाराम सदामते यांनी सोमवार, दि. ८ रोजी सभेचे आयोजन केले होते. सभेत सत्ताधारी मंडळींनी विरोधी स्वाभिमानी आघाडीलाच या पाणी टंचाईसाठी दोषी ठरवले. याला उत्तर देण्यासाठी विरोधी गटनेते दिलीप जाधव उभे राहिले असता, सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर जात त्यांना बोलण्यास अटकाव केला. यामुळे दळवी व येसुगडे गटातील संघर्ष विकोपाला गेला.
बुधवारी सकाळी साडेसात वाजता येसुगडे यांना जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या दळवी गटाने युवक कार्यकर्त्यांना एकत्र केले. याची माहिती सुरुवातीला येसुगडे गटाला नव्हती. याची कुणकुण लागताच सकाळी ११ वाजता स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे कार्यकर्तेही रागातच पलूसच्या मुख्य चौकात दाखल झाले. याची माहिती मिळताच काही ज्येष्ठ नेत्यांनी हा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी दोन्ही गट जुन्या बसस्थानक चौकात समोरासमोर आले. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. काहींनी काठ्या व इतर हत्यारेही आणली होती. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावल्याने मोठा अनर्थ टळला.
अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दगडफेकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या उजव्या हाताला दगड लागून दुखापत झाली. पोलिसांसह काही कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या घटनेबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिंदे व भिलवडीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील हरुगडे, कुंडलच्या सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील व सहायक निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी तासगाव, कुंडल, भिलवडी येथून जादा पोलिस कुमक मागवून परिस्थिती आटोक्यात आणली.