साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल पुनाळेकरला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:16 AM2019-05-28T11:16:31+5:302019-05-28T11:18:59+5:30
अॅड. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल संजीव पुनाळेकरला त्वरित अटक करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, आदी मागण्यांसाठी डावी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी, तपासात नावे निष्पन्न होतील तशी कारवाई होणारच असल्याचा निर्वाळा शिष्टमंडळास दिला.
कोल्हापूर : अॅड. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल संजीव पुनाळेकरला त्वरित अटक करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, आदी मागण्यांसाठी डावी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी, तपासात नावे निष्पन्न होतील तशी कारवाई होणारच असल्याचा निर्वाळा शिष्टमंडळास दिला.
दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेल्या व धार्मिक कार्याच्या बुरख्याआडून खुनी हिंसक, अतिरेकी कारवाया करणाऱ्या या आरोपींना दहशतवादी व अतिरेकी म्हणून जाहीर करावे, असे सांगून डाव्या आघाडीच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांना देण्यात आले.
पोलीस अधीक्षक देशमुख यांनी, एसआयटीला सर्व मागण्या कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच सीबीआय, एसआयटी आणि बंगलोर एसआयटी हे तिन्हीही संस्था चारही खून खटल्यांमध्ये अत्यंत समन्वयकपणे काम करत आहेत. तपासात संशयित आरोपी निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अनेकवेळा तपासात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे तपास काम उकलताना उशीर होत आहे; पण तपासकाम योग्य दिशेने सुरूअसल्याचा निर्वाळा देशमुख यांनी दिला.
डाव्या आघाडीच्या शिष्टमंडळात सतिशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, चंद्रकांत यादव, रवी जाधव, प्रशांत आंबी, बाळासाहेब बर्गे, दिलावर मुजावर, शिवाजी माळी, बन्सी सातपुते, इर्शाद फरास, मुकुंद कदम, जावेद तांबोळी, सुनील कोळी, आरती रेडेकर, आदींचा समावेश होता.
मागण्या ...
- पानसरे खून खटल्यात साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल पुनाळेकरला अटक करावी.
- सर्व पोलीस ठाण्यांत फरारी आरोपींची छायाचित्रे लावावीत, भित्तीपत्रके सर्व चौका-चौकांत, बसथांबे, गर्दीच्या ठिकाणी लावावीत, आदी मागण्या करण्यात आल्या.
- गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनातील आरोपींना अतिरेकी व दहशतवादी जाहीर करावे.
- सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या अटकेसाठी ‘लूक आऊट’ नोटीस जारी करावी.
- सर्व सनातनच्या आश्रमामध्ये विनय पवार व सारंग अकोलकर यांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन करावे.
- सनातन संस्थेवर बंदी घालावी.