पंच कमिटीने विकासाचा मास्टर प्लॅन तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:34+5:302021-02-23T04:38:34+5:30
चंदगड : गावचा विकास होण्यासाठी पंच कमिटीने विकासाचा मास्टर प्लॅन तयार करावा. रस्ते, गटारी झाली म्हणजेच विकास होत ...
चंदगड : गावचा विकास होण्यासाठी पंच कमिटीने विकासाचा मास्टर प्लॅन तयार करावा. रस्ते, गटारी झाली म्हणजेच विकास होत नाही. गावात प्रथम पिण्याचे पाणी, आरोग्य, शौचालय या मूलभूत सुविधा पुरवल्या तर विकासाची सुरुवात होते. गटा-तटातील भांडणे सोडविणे हे काम पाच वर्षे न करता विधायक कामे करा, असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले.
चंदगड येथे महाआवास योजना ग्रामीण अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती अॅड. अनंत कांबळे होते. तहसीलदार विनोद रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती मनीषा शिवणगेकर, विठाबाई मुरकुटे, आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी प्रास्ताविक करून योजनेचा उद्देश स्पष्ट केला.
पाटील म्हणाले, महाआवास अभियान ग्रामीण राबविण्याचा उद्देश म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण योजनेमध्ये शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्व घटक यांचा सक्रिय सहभाग वाढविणे.
ग्रामीण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी जनजागृती करणे. ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत गरजूंना पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यास लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना सरपंच, ग्रामसेवक यांनीही सहकार्य करावे.
सभापती कांबळे, वीजवितरणचे प्र. कार्यकारी अभियंता संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी विस्तार अधिकारी अमृता देशपांडे, सरपंच आर. जी. पाटील, अरुण पाटील, संजय चंदगडकर, डी. जी. नाईक, माधुरी सावंत, स्वप्नाली गवस, श्रीधर भोगण, रजत हुलजी, धैर्यशील यादव, आदींसह सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कृषी अधिकारी संतोष जाधव यांनी आभार मानले.