कोल्हापुरातील दहा हजार बाधित कुटुंबांचे पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:00+5:302021-08-12T04:29:00+5:30
कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे शहरातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात १० हजार २२५ बाधित कुटुंबे, दोन ...
कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे शहरातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात १० हजार २२५ बाधित कुटुंबे, दोन हजार ६५७ दुकाने, ७५९ हस्तकला कारागिरांचा समावेश आहे. डेटा एंट्री, लाभार्थी यादी प्रसिद्धी, हरकती, सूचना यांचा विचार करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने घरांची, गोठ्याची पडझड, जनावरांचा मृत्यू, हस्तकला कारागीर, प्रापंचिक साहित्य, दुकाने, व्यावसायिक अशा सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून जात आहे. करवीर व शिरोळ तालुक्यांत सर्वाधिक नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांपैकी करवीरमधील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात कोल्हापूर शहरातील बाधितांची संख्या जास्त आहे. पंचनाम्यांसाठी ३३ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांपैकी सहा पथकांचे काम पूर्ण झाले असून, त्यांना ज्यांच्या पंचनाम्याचे क्षेत्र मोठे आहे, अशा पथकांना मदत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या वतीने डेटा एंट्री करून लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती, सूचना आल्यानंतर त्यांचा विचार करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.
--
झालेले पंचनामे असे...
नुकसानीचा प्रकार : कोल्हापूर शहर : ग्रामीण
घर पडझड : ८३ : २२०
गोठा पडझड : ७९ : १००
मृत जनावरे : ० : १२२५
हस्तकला, कारागीर : ७५९ : १७
प्रापंचिक साहित्याचे नुकसान : १० हजार २२५ : ४ हजार ५२५
दुकाने, व्यावसायिक, टपऱ्या : २ हजार ६५७ : ६३३
---