दाटे येथे नुकसानग्रस्तांचा केला पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:27 AM2021-07-27T04:27:01+5:302021-07-27T04:27:01+5:30
पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने पुराच्या पाण्याचा फटका बसून, अनेकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ग्रामपंचायत स्तरावर पंचनामे करण्यास सुरुवात ...
पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने पुराच्या पाण्याचा फटका बसून, अनेकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ग्रामपंचायत स्तरावर पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
अतिवृष्टीमुळे घटप्रभा व झांबरे धरणातून पाणी सोडल्याने ताम्रपर्णी, घटप्रभा नदीला पूर आला होता. या पुराचा फटका कोवाड, कानडी, दाटे, चंदगड, नरेवाडीसह १९ गावांना बसला. ८९५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
शासनाच्या आदेशानुसार दाटे ग्रामपंचायतीतर्फे सोमवारी बेळेभाट येथील स्थलांतरित लोकांची भेट घेऊन नुकसानीबाबत माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात आला.
यावेळी सरपंच अमोल कांबळे, तलाठी शिवनगेकर, पोलीसपाटील संदीप गुरव, मंडल अधिकारी कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.
फोटो ओळी : दाटे (ता. चंदगड) येथील स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन माहिती घेताना पोलीसपाटील संदीप गुरव, सरपंच अमोल कांबळे आदी.
क्रमांक : २६०७२०२१-गड-०६