पुणे-बंगलोर महामार्ग आज सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:45+5:302021-07-26T04:22:45+5:30
कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज, सोमवारी सकाळपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रविवारीही (दि. २५) दिवसभर ती बंद ...
कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज, सोमवारी सकाळपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रविवारीही (दि. २५) दिवसभर ती बंद राहिली. शुक्रवारी सायंकाळपासून तब्बल ४८ तासांहून अधिक काळ ही वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागून राहिल्या आहेत. पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी कमी होण्याची गती फार संथ आहे. पावसाने रविवारी दिवसभर चांगली विश्रांती दिली आहे. त्यामुळे आज, सोमवारी सकाळी वाहतूक सुरू होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोलीजवळ रस्त्यावर रविवारी दुपारपर्यंत सुमारे तीन फुटांहून जास्त पाणी होते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने जास्त वजनाचे पोकलॅन मशीन या महामार्गावरून जाऊ शकते का याची चाचणी घेतली; परंतु हे मशीन कसेबसे शंभर मीटरपर्यंत गेल्यावर पाण्याची धार जास्त असल्याने चालकाने ते मागे वळवले. शिरोलीजवळ किमान चारशे मीटरच्या टप्प्यात पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तिथे रविवारी सायंकाळी पाच वाजता किमान ४ फूट पाणी वाहत होते. हे पाणी रात्रीत कमी झाल्यास आज, सोमवारी सकाळी अगोदर अत्यावश्यक सेवेतील जड वाहने सोडण्यात येतील, असे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लोकमतला सांगितले. राधानगरी धरणातील दोन स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगेतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरीही नदीतील एकूण विसर्ग पाहता महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता जास्त आहे.
सांगली जिल्ह्यातील कणेगाव व तांदूळवाडीजवळ पाणी आल्याने बंद असलेली वाहतूक रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली आहे. कागलजवळील आयबीपी पंपाजवळ रविवारी सायंकाळही दोन फुटापर्यंत पाणी होते. हे पाणी आज सोमवार सकाळपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
महामार्ग कोल्हापूरपर्यंतच सुरू..?
पुणे-बंगलोर महामार्गावर जरी पुराचे पाणी कमी झाले तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावरील दूधगंगा व वेदगंगा नदीवरील पुलाची पाहणी करण्यासाठी धारवाडहून पाटबंधारे विभागाचे पथक येणार आहे. त्यांनी पाहणी केल्यानंतर वाहतुकीस परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे ही वाहतूक सोमवारी सकाळी लगेच सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.