Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: औद्योगिक क्षेत्रात नवे बोगदे, विस्तारीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:01 PM2024-03-29T17:01:22+5:302024-03-29T17:01:49+5:30
सतीश पाटील शिरोली : कागल-सातारा या १३३ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सध्या सहापदरीकरण सुरू आहे. या मध्ये वारणा नदी ते ...
सतीश पाटील
शिरोली : कागल-सातारा या १३३ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सध्या सहापदरीकरण सुरू आहे. या मध्ये वारणा नदी ते कागल या २९ किलोमीटर अंतरावरील अनेक ठिकाणी मोठे बोगदे तर काही ठिकाणी बदल होणार आहेत.
मंगरायाचीवाडी, मेनन पिस्टन, नागाव फाटा, सांगली फाटा, याठिकाणी २५ मिटरचे तर उचगाव, उजळाईवाडी, कणेरीवाडी याठिकाणी २० मिटरचे बोगदे होणार आहेत.
मंगरायचीवाडी येथे नवीन लहान औद्योगिक वसाहत विस्तारीत होत आहे, तसेच दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची असलेली शेती, यामुळे याठिकाणी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी केली, शिरोली एम आय डी सी मध्ये मोठे मालवाहतूक गाड्या येण्यासाठी आणि जाण्यासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) आणि उद्योजकांची मागणी होती. त्यामुळे याठिकाणी बोगदा होणार आहे.
तसेच नागाव फाटा येथे मोठा अपघात स्पाॅट असल्याने तसेच दोन्ही बाजूला ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने मोठ्या व्यावहारिक गाड्यांची रेलचेल असते तसेच नागाव आणि शिरोली गावातील स्थानिक लोकांच्यासाठी याठिकाणी बोगद्याचे काम सुरू आहे. शिरोली सांगली फाटा येथे सांगलीला जाण्यासाठी जुना एक मार्गी मोठा बोगदा होता. आता दोन्ही बाजूला बोगदा याठिकाणी होत आहे.
तसेच उचगाव फाटा येथे हुपरी ला जाराणारा मार्गावर सध्या लहान बोगदा असल्याने सतत याठिकाणी वाहतूक कोंडी होते. याठिकाणचा सध्याचा बोगदा पाडून नवीन २० मिटरचा बोगदा केला जाणार आहे. उजळाईवाडी, के आय टी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी याठिकाणी २० मिटरचा बोगदा केला जणार आहे.
शिरोली एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग आहेत याठिकाणी दररोज मालवाहतूक गाड्या येतात आणि जातात या गाड्यांसाठी मोठा बोगदा पाहिजे तसेच एमआयडीसी ला मोठे प्रवेशद्वार असणे आवश्यक होते. याबाबत स्मॅकने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी मागणी केली होती - सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक
मंगरायाचीवाडी येथे दोन्ही बाजूला खाजगी लघू औद्योगिक वसाहत वसली आहे. याठिकाणी दोन्ही बाजूला स्थानिक लोकांची शेती आहे. म्हणून याठिकाणी मोठा बोगदा होणे गरजेचे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा बोगदा मंजूर करून घेतला आहे. - सुमंत पाटील, उद्योजक, प्राईम इस्टेट