corona virus -एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:22 PM2020-03-12T17:22:25+5:302020-03-12T17:24:00+5:30
नागाळा पार्क येथील एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर संबंधित व्यक्ती गेली असता परदेशी पर्यटकांना त्यांनी पाहिले. परंतु त्यांना ताप आल्याने शंका नको म्हणून ही व्यक्ती तपासणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कक्षामध्ये आली होती.
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील एकाच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर संबंधित व्यक्ती गेली असता परदेशी पर्यटकांना त्यांनी पाहिले. परंतु त्यांना ताप आल्याने शंका नको म्हणून ही व्यक्ती तपासणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कक्षामध्ये आली होती.
या विशेष कक्षामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये १९ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये इचलकरंजीच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. दुबई, इराण, जर्मनी, इटली या देशांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूरमध्ये कोरोनाबाबत जागृती होत आहे. अशातच चार दिवसांपूर्वी विदेशी गेलेले स्थानिक परतले असल्याने मात्र काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही कोरोनाची माहिती न लपविण्याचे आवाहन केले असून, याचे गांभीर्य ओळखून परदेशी जाऊन आलेले नागरिकही सीपीआरमध्ये स्वत:हून तपासणीसाठी येत आहेत. चारच दिवसांपूर्वी दुबईसह अन्य देशांमधून काही नागरिक कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
त्यातील मंगळवारी आठ, तर बुधवारी ११ जणांची तपासणी करण्यात आली. यातील मंगळवारी एकाला, तर बुधवारी एकाला ताप आणि खोकला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांचेही घशाचे स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
परदेशी पर्यटकांना पाहिल्याने सीपीआरमध्ये धाव
रोज कोरोनाबाबतच्या बातम्यांनी घाबरलेल्या नागाळा पार्कमधील एका व्यक्तीने कोल्हापूरच्या विमानतळावर केवळ परदेशी पर्यटकांना पाहिले म्हणून सीपीआरकडे धाव घेतली. आपण कोणत्याही परदेशी व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलो नाही. मात्र, त्यांना मी जवळून पाहिले. आता मला ताप आणि खोकला आला आहे. तेव्हा तपासणी करा, असे या व्यक्तीने सांगितले. याच पद्धतीने इतरांनीही जागरूकता दाखविणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुंबईतील पुरस्कार वितरणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
आज, गुरुवारी मुंबई येथे यशवंत पंचायत राज स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, बुधवारी दुपारी मंत्रालयातून आलेल्या सूचनेनुसार या सर्वांना सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. आजी-माजी अध्यक्षांसह पदाधिकारी आणि अधिकारीही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच मुंबईला रवाना झाले आहेत. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची तब्ब्येत बरी नसल्याने मुंबईला जाणे रद्द केले.
सकाळ, संध्याकाळी पुण्याची ड्युटी
संशयितांच्या घशातील स्राव घेतल्यानंतर ते २४ तासांत पुण्यामध्ये तपासणीसाठी पाठविणे आवश्यक असल्याने सीपीआरच्यावतीने दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. सकाळी एक आणि सायंकाळी एक पथक हा घशातील स्राव घेऊन पुण्याला जात असल्याचे सांगण्यात आले.
रंगपंचमीवेळी दक्षता आवश्यक
नागरिकांनी रंगपंचमी खेळताना एकत्र जमून गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. शक्यतो घराबाहेर पडू नये. तसेच दहावी, बारावीची परीक्षा सुरू असल्याने गोंगाट करून शांततेचा भंग करू नये. मोटारसायकलच्या पुंगळ्या काढून मोटारसायकली फिरवू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.