‘पुणे-कोल्हापूर-पुणे’ गणपती विशेष रेल्वे
By Admin | Published: September 12, 2015 11:51 PM2015-09-12T23:51:30+5:302015-09-12T23:51:30+5:30
उद्यापासून सेवा सुरू : पहाटे पावणेपाचला पुण्याहून, तर दुपारी अडीचला कोल्हापुरातून सुटणार
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथून कोल्हापूरकडे येणाऱ्या व कोल्हापुरातून पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, यंदा मध्य रेल्वेने ‘ पुणे-कोल्हापूर-पुणे’ या गणपती उत्सव विशेष रेल्वेगाडीची सोय केली असून, ती उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे.
या रेल्वे सेवाअंतर्गत कोल्हापुरातून ही रेल्वे दररोज दुपारी अडीच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून सुटणार आहे; तर पुण्याहून येणारी रेल्वे पुणे स्टेशन येथून पहाटे पावणेपाच वाजता सुटणार आहे. पुण्याहून सुटणारी ही पॅसेंजर रेल्वे नीरा, लोणंद, सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, हातकणंगले, रुकडी असे थांबे घेत कोल्हापुरातील शाहू टर्मिनसवर दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे; तर कोल्हापुरातून सुटणारी पॅसेंजर हेच थांबे घेत पुण्यास रात्री साडेदहा वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेस १२ डबे असणार आहेत. याशिवाय पुणे पॅसेंजर व नियमित गाड्याही प्रवाशांच्या सोयीसाठी असणार आहेत. सध्या पुणे येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एस.टी. बसचा प्रवास सर्वसामान्यांना आता परवडेनासा झाला आहे. रेल्वेचे जनरल तिकीट ९० ते १०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे सध्या रेल्वेने कोल्हापूर-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेने ही विशेष गाडीची तरतूद केली आहे. ( प्रतिनिधी )