पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ मार्च अखेर मुदतवाढ

By संदीप आडनाईक | Published: December 20, 2023 07:30 PM2023-12-20T19:30:10+5:302023-12-20T19:30:29+5:30

रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचा निर्णय, 'लोकमत'च्या वृत्त मालिकेची दखल 

Pune-Kolhapur Special Railway extended till March 31 | पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ मार्च अखेर मुदतवाढ

पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ मार्च अखेर मुदतवाढ

कोल्हापूर : कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर तातडीने चार फिरते स्वच्छतागृह बसवण्यात येणार असून पुणे- कोल्हापूर ही विशेष रेल्वे ३१ मार्च अखेर सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी रेल्वेच्या विभागीय प्रबंधक इंदूराणी दुबे होत्या. रेल्वे स्थानकावरील कामे संथ सुरू असल्याच्या तसेच प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या लोकमतच्या वृत्त मालिकेची दखल या बैठकीत घेण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच स्थानकावर फिरते स्वच्छतागृह उद्या, गुरुवारी बसवण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्जीवनाचे काम अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू आहे, मात्र या कामाला अद्याप गती मिळालेली नाही, या शिवाय प्रवासांच्या अनेक गैरसोयी दूर करण्याची मागणी या बैठकीत रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली. 

या बैठकीला बियाणी यांच्यासह मिरजेचे किशोर बोरावत, निखिल कांची, बशीर सुतार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, जन संपर्क अधिकारी रामपाल बडबग्गा उपस्थित होते. विशेषत: रेल्वे स्थानकावर नवीन स्वच्छतागृह बंद केल्याने प्रवाशांची कुचंबणा होत असल्याचा मुद्दा यावेळी चर्चेत घेण्यात आला. यावर नियमित काम पूर्ण होईपर्यंत तातडीने चार फिरते स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी तत्काळ म्हणजे उद्याच करण्यात येणार आहे.

पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे ३१ मार्चपर्यंत दरम्यान, पुणे-कोल्हापूर ही विशेष रेल्वे ३१ डिसेंबर पर्यंत धावणार होती. याबाबत प्रवासी संघटनेने रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्याला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही गाडी रेल्वे मार्गाचे दुहेरिकरण झाल्यानंतरच सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे.

Web Title: Pune-Kolhapur Special Railway extended till March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.