‘अग्निदिव्य’चे कलाकार स्विकारणार पुण्यात पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 07:25 PM2017-06-08T19:25:31+5:302017-06-08T19:25:31+5:30
स्व. सागरचा मृत्यनंतर होणार सन्मान : १३ जून रोजी समारंभ
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0९ : ५६ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रात झालेल्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ संस्थेच्या ‘अग्निदिव्य’ या नाटकाला मिळालेले पारितोषिक ‘अग्निदिव्य’चे कलाकार मंगळवार, दि. १३ जून रोजी पुण्यात होणाऱ्या समारंभात स्विकारणार आहेत.
कोल्हापूर विभागात सहभागी झालेल्या एकुण २0 नाटकांतून प्राथमिक फेरीत ‘अग्निदिव्य’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. दि. ३ मार्च रोजी पुण्यातील टिळक स्मारक येथे झालेल्या अंतिम फेरीत या नाटकाचा प्रयोग सुरु असताना करवीर संस्थानचे अधिपती लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका जिवंत करणारा कोल्हापुरचा सुपुत्र स्व. सागर चौगुले याचा रंगभूमीवरच आकस्मिकरित्या मृत्यू झाला. सागर याला प्राथमिक फेरीत अभिनयाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले होते, परंतु अंतिम फेरीत अवघ्या ३५ मिनिटाच्या अभिनयात त्याला मृत्यूने गाठले होते.
रंगमंचावरील पहिल्या प्रयत्नातच या स्पर्धेत ‘अग्निदिव्य’ नाटकासाठी मिळालेले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा आणि अभिनय अशी पाच पारितोषिके हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ संस्थेच्या कलाकारांनी जिंकली. हा पारितोषिक प्रदान समारंभ पुण्यातील भरत नाट्य संशोधन केंद्र येथे मंगळवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ६.३0 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘अग्निदिव्य’ या नाटकातील ‘उत्कृष्ट अभिनय’ यासाठी स्व. सागर चौगले याच्यासह सुनील माने यांना ‘उत्कृष्ट दिग्दर्शका’चे , हिंदुराव पाटील यांना ‘उत्कृष्ट नेपथ्यकारा’चे, शशिकांत यादव यांना रंगभूषा विभागात प्रथम पारितोषिक मिळाले. याशिवाय ‘अग्निदिव्य’ला सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हे सर्व कलाकार या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
आज स्वर्गीय सागर आपल्यात नाही ही खंत आमच्यात निरंतर राहणार आहेच, पण सागर चौगले यास प्राथमिक फेरीत जे प्रथम पारितोषिक मिळाले ते त्याच्यावतीने त्याच्या कुटुंबीयांनी स्विकारावे यासाठी हे नाटक सादर करणारी संस्था हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ आणि हनुमान तरुण मंडळ यांची इच्छा आहे.
पद्याकर कापसे,
अध्यक्ष, हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ
सरकारकडून निमंत्रणच नाही
प्राथमिक फेरीत ‘अग्निदिव्य’ या नाटकाला पाच विविध पुरस्कार मिळालेले आहेत. हा पारितोषिक समारंभ १३ जून रोजी पुण्यात होणार आहे. परंतु ‘अग्निदिव्य’ च्या विजेत्यांना या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण अद्यापही मिळालेले नाही. पारितोषिक वितरणाची पत्रिका पाठविण्याची तसदीही संंबंधित खात्याने घेतली नसल्याबद्दल कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात खंत व्यक्त होत आहे.