पन्हाळगडावर ‘राइस पुलर पॉट’च्या नावाने गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:45 AM2019-05-11T00:45:41+5:302019-05-11T00:46:48+5:30

पन्हाळा शहर व परिसरातील गुंतवणूकदारांना ‘राईस पुलर पॉट’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची भीती व्यक्त होत आहे.

 Punhalgad on the name of 'Rice Pullar Pot' | पन्हाळगडावर ‘राइस पुलर पॉट’च्या नावाने गंडा

पन्हाळगडावर ‘राइस पुलर पॉट’च्या नावाने गंडा

Next
ठळक मुद्देगुंतवणूकदार हडबडले : सुमारे २ कोटींच्या फसवणुकीची भीती

नितीन भगवान ।
पन्हाळा : पन्हाळा शहर व परिसरातील गुंतवणूकदारांना ‘राईस पुलर पॉट’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत अद्यापही तक्रारदार पुढे आले नसले तरी एक ते दीड वर्ष झाले तरी पैसे परत मिळत नसल्याने त्यांची बेचैनी वाढली आहे.

‘राइस पुलर पॉट’हा फसवणुकीचा एक नवाच फंडा पुढे आला आहे. पन्हाळा परिसरातील अनेकजण याला भुलले आहेत. काहींनी लाखात यामध्ये रक्कम गुंतवल्याची माहिती पुढे येत आहे. ‘राईस पुलर पॉट’ हे पंचधातूचे भांडे असून यावर वीज पडल्याचा दावा केला जातो. तसेच तांदूळ टाकले की या भांड्याकडे आकर्षित होतात, असे झाल्यास हे भांडे खरे असे सांगितले जाते. याबाबतचा व्हिडीओ गुंतवणुकदारांना दाखवून वीज पडलेल्या या भांड्याचा वापर उपग्रह तसेच यानात केला जात असल्याचे व याची किंमत हजारो कोटी रुपये असल्याचे खोटे सांगीतले जाते.

आपल्या कंपनीतर्फे हे भांडे २५० कोटी रुपयांना खरेदी करुन नासा किंवा इस्त्रो या कंपन्यांना एक हजार कोटींना विकले जाणार असून यामधून मिळणाऱ्या ७५० कोटी रुपये फायद्यातून प्रत्येक गुंतवणुकदारांना शंभरपट परतावा दिला जाईल, असे खोटे गणित मांडले जाते.

हे सर्व पटविण्यासाठी कंपनीची एक टीम सज्ज असते. आलिशान गाडी, त्यात उंची पेहराव केलेले चारजण, सोबत किमती लॅपटॉप, त्यात ‘राइस पुलर पॉट’ची व हे भांडे मी खरेदी करीत असल्याची शास्रज्ञांची क्लिप दाखविली जाते. ग्राहक पटला की त्याला रितसर कंपनीचे अ‍ॅग्रीमेंट करून देतात आणी हे पैसे घेऊन जातात.
पन्हाळा शहरात या योजनेला भुलून वर्षभरात ७५ लाख ते एक कोटी रुपये लोकांनी गुंतविले असून, परिसरातून १.५ ते २ कोटी रुपये गुंतल्याचा आकडा पुढे येत आहे. यात लहान व्यावसायिक, नोकरदार, राजकारणी, व्यापारी, उद्योजक यांचा समावेश आहे.

पैसे गुंतवणूक वर्ष होवून गेले तरीही अद्याप रुपयाही न मिळाल्यांने चलबिचल झालेले गुंतवणूकदार २५० कोटी कंपनीकडे जमलेत का? यांची विचारणा करण्यासाठी सतत फोन करीत आहेत.
पैसे परत मिळत नसल्याने मध्यंतरी काहीजण मुंबईला जाऊन तेथील कंपनीचे कामकाज पाहून तेथील कर्मचाऱ्यांना भेटून आल्याचे समजते. अजून २५० कोटी जमा झालेले नाहीत. जमा झाले की, आपल्याला कळविले जाईल. आणी ‘राईस पुलर पॉट’ विक्री झाला की आपल्याला बोलवून पैसे दिले जातील, असे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचे यातील कांही गुंतवणूकदारांनी सांगितले.

Web Title:  Punhalgad on the name of 'Rice Pullar Pot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.