पंचगंगेत टाकलेले निर्माल्य संबंधितांकडून बाहेर काढून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 04:51 PM2020-05-07T16:51:30+5:302020-05-07T16:56:44+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून ...
कोल्हापूर : पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून काढण्यास भाग पाडले. महापालिकेच्या वतीने कारवाई करणा-या या अधिका-याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने, औद्योगिक वसाहती बंद असल्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी झाले आहे. याच दरम्यान पंचगंगा घाटावर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हताm त्यामुळे परिसर स्वच्छ बनला आहे. येथून पुढेही नदी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. तसेच महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सक्रीय झाली आहे. याची प्रचिती बुधवारी (दि. ६) आली. फुलेवाडी परिसरातील पांडुरंग पाटील यांनी बुधवारी दुपारी पंचगंगा नदीत निर्माल्य टाकले.
याचवेळी महापालिकेतील आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी संबंधित व्यक्तीला समज दिली. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच नदीत टाकलेले निर्माल्यही त्याला काढून घेण्यास भाग पाडले. प्रदूषण रोखण्याबाबत त्याचे प्रबोधनही करण्यात आले. संबंधित व्यक्तीने माफी मागितली.
लॉकडाऊनमध्ये पंचगंगा नदीघाटावर विशेष लक्ष दिले जात आहे. बुधवारी एकाने नदीत निर्माल्य टाकले. ‘नदी किती स्वच्छ दिसते. कायम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे,’ अशा शब्दांत त्याला समज देण्यात आली. दंड वसूल करण्याबरोबरच त्याच्याकडूनच टाकलेले निर्माल्य बाहेर काढून घेण्यात आले.
अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका