पंजाब-हरियाणा अंतिम लढत
By admin | Published: December 31, 2014 12:29 AM2014-12-31T00:29:47+5:302014-12-31T00:38:30+5:30
राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धा : मुलींच्या गटात तमिळनाडू विरुद्ध हरियाणा सामना
नवे पारगाव : नवे पारगाव-विनय नगर (ता.हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या क्रीडांगणावर आज, मंगळवारी चौथ्या दिवशी झालेल्या राष्ट्रीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात पंजाबने, तर मुलींच्या गटात हरियाणा व तमिळनाडू या संघांनी आपल्या नेत्रदीपक खेळीने अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पश्चिम बंगालने हरियाणावर मात केली. दुसऱ्या सामन्यांत महाराष्ट्राने दिल्लीला २५-२२, २५-१९, २५-१९ असे नमविले. तिसऱ्या सामन्यांत केरळने कर्नाटकवर तर चौथ्या सामन्यांत तमिळनाडूने पॉण्डेचरीचा एकतर्फी पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.
पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने हरियाणाला झुंजविले; परंतु हरियाणाने पहिला, तिसरा आणि चौथा सेट जिंकल्याने महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. मुलींच्या गटातील दुसऱ्या उपांत्य सामना केरळ व तमिळनाडू यांच्यात झाला हा सामना तमिळनाडूने जिंकला. मुलींच्या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र विरुद्ध केरळ अशी लढत उद्या, बुधवारी होणार आहे.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणाने हिमाचल प्रदेशला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओरिसाने केरळवर एकतर्फी विजय नोंदवला. तिसऱ्या सामन्यात तमिळनाडूने उत्तराखंडला नमवून उपांत्य फेरी गाठली. चौथ्या सामन्यांत गुजरातचा पंजाबने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.
रात्री प्रकाश झोतात हरियाणाने केरळवर विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला.पंजाबने तीन सेट जिंकत अंतिम फेरी गाठली.उद्या, बुधवारी मुलांच्या गटात हरियाणा आणि पंजाबमध्ये अजिंक्यपदासाठी, तर केरळ आणि तमिळनाडूमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे.