पंजाबच्या तरुणाईला परिवर्तनाची अपेक्षा
By admin | Published: February 13, 2017 12:48 AM2017-02-13T00:48:39+5:302017-02-13T00:48:39+5:30
महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण
कोल्हापूर : पंजाबमधील तरुणाईच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी परिवर्तनाची अपेक्षा आहे. आम्हाला नोकरी हवी आहे, अशा भावना पंजाबमधील युवकांनी रविवारी ‘शिवोत्सव’मध्ये व्यक्त केल्या.
पंजाबच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये बी. टेक्. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या जसबीत सिंगने, यंदाच्या निवडणुकीत तरुणाईने प्राधान्याने मतदान केले आहे. त्यामुळे
आम्हा युवकांना यावेळी सत्ता परिवर्तनाची अपेक्षा असल्याचे सांगितले. महाराष्ट्र, कोल्हापुरात पहिल्यांदाच आलो असून येथील वातावरण खूपच चांगले असल्याचे त्याने सांगितले.
एम. टेक्.मध्ये शिकणाऱ्या जसवंतसिंगने शिक्षणाच्या अद्ययावत सुविधांसह युवकांना नोकरी हवी असल्याचे सांगितले. पंजाब कृषी विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक असणाऱ्या सतवीरसिंग यांनी
सांगितले की, पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत तरुणाईने अत्यंत जागरूकपणे मतदान केले आहे.
त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच युवावर्गाच्या मतदानाची टक्केवारी वाढली, हे चांगले चित्र आहे. आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच आलो आहोत. कोल्हापुरी चप्पलबाबत ऐकून होतो, त्याबद्दल उत्स्कुता होती. येथून जाताना मी ती आवर्जून खरेदी करणार आहे. (प्रतिनिधी)