पुण्याई - भाग ४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:37+5:302021-09-25T04:23:37+5:30
‘या की हो काकू...’ ‘तूच ये. एकटीच आहेस ना..मला सुरळीच्या वड्या करून दे. सगळी तयारी केली आहे. तुझा फार ...
‘या की हो काकू...’
‘तूच ये. एकटीच आहेस ना..मला सुरळीच्या वड्या करून दे. सगळी तयारी केली आहे. तुझा फार वेळ घेणार नाही
मला जमतच नाहीत बघ.’
नीलिमा काकूंना सुरळीच्या करून देऊन घरात आली खरी....पण सुमनताईंचा विचार सोबत होताच. सुरळीच्या वड्याच काय कितीतरी पदार्थ...जवळजवळ सगळच शिकविलं होतं तिला सुमनताईंनी!
सुमनताई गावाकडं गेल्यावर त्याचा पत्रव्यवहार सुरू होता. पत्रातूनसुद्धा। नीलिमा त्यांना पदार्थांच्या कृती विचारत असे...नंतर त्यांच्या मिस्टरांची तब्बेत बिघडली...सुमनताईंच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं.
पंधरा दिवसांपूर्वीच मिस्टरांची तब्बेत दाखविण्यासाठी त्या मुलाकडं आल्या. मुलाकडं फोन असल्यानं त्यांनी दोन-तीनदा फोन केला होता; पण आजचा फोन....
‘सुमनताईच्या मिस्टरांची तब्बेत?’ नीलिमाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रात्र संपेना...पहाट होताच नीलिमा उठली. आवरून सातारा स्टँडवर आली. लगेच कोल्हापूरची गाडी मिळाली.
सातारा स्टँडवर उतरली. सुमनताईंनी सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे ती रिक्षाने तिच्या घरी आली. बेल दाबल्यावर सुमनताईनेच दार उघडले.
‘अगदी योग्यवेळी आलीस....ये...’
नीलिमा घरात आली. सुमनताईंचे मिस्टर बाहेरच कॉटवर झोपले होते.
‘कशी आहे काकांची तब्बेत?’
‘बरी आहे. मुलाची मदत झाली; पण सून ठेवून घेण्यास तयार नाही. आम्ही उद्या जातोय. गावी येण्यासाठी सामान वगैरे आणि इतर कामासाठी ते बाहेर गेलेत. संध्याकाळी येतो असं म्हणाले. आपण जेवायला बसण्यापूर्वी...’ असं म्हणत सुमनताई आत गेली आणि तिनं एक हँडबँग बाहेर आणली.
‘ही घरी गेल्यावर उघड, सर्व उलगडा होईल. तू जेवण करून बाहेर पड...संध्याकाळी येतो म्हणाले, त्यांचा भरवसा नाही. आता आपली गाठ पडेल असं वाटत नाही...हे देण्यासाठी तुला बोलावलं...आता मी पूर्ण समाधानी आहे. सुमनताईंनी नीलिमाला आपल्या कुशीत घेतले. सुमनताईंच्या प्रेमाचे गरम अश्रू नीलिमाच्या कपाळावर पडले.
संध्याकाळी नीलिमा घरी पोहोचली. हात-पाय देवापुढं दिवा लावून तिनं चहा करून घेतला आणि सुमनताईंनी दिलेली हँडबँग उघडली. वर घातलेला टॉवेल काढला. पैठणीची घडी बघून तिचे डोळे भरून आले. अलगद ती घडी काढून तिनं छातीशी धरत बॅगेतला एक बॉक्स काढला. त्याखालच्या साड्याही काढल्या. बॅग बाजूला करीत नीलिमानं बॉक्स उघडला. वरच एक कागदाची घडी होती. नीलिमानं घडी उघडली.
चि.सौ. नीलिमा लग्न गडबडीत झाल्यानं आणि सासरचा गैरसमज व्हायला नको म्हणून मी काही द्यायचे राखून ठेवले, कन्यादानाचं असं काहीच देता आलं नाही. खरं तर हे सर्व मी माझ्या मुलीसाठी जमवलं होतं. मला तिला सजलेल्या नवरीच्या रूपात बघायचं होतं; पण मी आले तेव्हाच ती आफ्रिकेला गेली कायमची! एक धागा तुटला. नवऱ्याच्या औषध-पाण्यासाठी आले तेव्हा दुसरा धागाही ताणल्याचे जाणवले. आता खरा रेशीम धागा तूच म्हणून हे सर्व कन्यादानाचं म्हणून तुला देत आहे. ते स्वीकारून मुलींनी दुखावलेल्या माझ्या मनाचा सन्मान करून वापर. पैठणी नेसून दागिने घातलेले फोटो मला पाठव. चांदीचे ताम्हण, निरांजन जावयांसाठी ! कधी जमलं तर भेटायला ये...तुझी आई...’
‘माझी पुण्याई म्हणून मला ही आई मिळाली...मी तिला एकटं टाकणार नाही. नीलिमानं त्या दोघांना आपल्याकडं आणण्याचा निर्णय घेतला.’
--------------------------- अनुराधा फाटक,
सी १००१, स्वीस कौंटी, थेरगाव, पिंपरी चिंचवड, पुणे